Sandeep Sagale : गुजरातमध्ये मराठमोळं पाऊल! अकोल्याचे सुपुत्र संदीप सागळे गुजरातचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त
Sandeep Sagle Gujarat Chief Election Commissioner : शिस्तप्रिय आणि रोखठोक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या संदीप सागळे यांच्या नियुक्तीमुळे निवडणूक प्रक्रियेला अधिक गती मिळेल असं म्हटलं जातंय.

मुंबई : मराठमोळ्या अधिकाऱ्यांची देशभरात घोडदौड सुरू असून आताही राज्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवण्यात आला आहे. गुजरातमध्ये आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची प्रशासकीय नियुक्ती करण्यात आली आहे. अकोल्याचे सुपुत्र आणि 2007 बॅचचे मराठमोळे आयएएस अधिकारी संदीप सागळे (Sandeep Sagle) यांची गुजरात राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) ही नियुक्ती जाहीर केली आहे. गुजरात कॅडरचे अधिकारी असलेल्या सागळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच येणाऱ्या काळातील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.
अहमदाबादसह अनेक जिल्ह्यांचा प्रशासकीय अनुभव (Administrative Experience in Gujarat)
16 नोव्हेंबर 1973 रोजी जन्मलेले संदीप सागळे हे मूळचे महाराष्ट्रातील अकोल्याचे आहेत. त्यांचे वडील जनार्दन सागळे हे अकोला जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. सागळे यांचे शिक्षण अकोला आणि वाशीम येथे झाले आहे
संदीप सागळे यांनी यापूर्वी गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad) येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच बनासकांठा आणि भरूच या जिल्ह्यांमध्येही त्यांनी जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. काही काळ त्यांनी गांधीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही कार्य केले आहे. दोन वेळा त्यांना बेस्ट कलेक्टर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी मतदार यादीच्या विशेष गहन सुधारणा (SIR) प्रक्रियेचेही पर्यवेक्षण केले आहे. यापूर्वी ही जबाबदारी आयएएस अधिकारी हरित शुक्ला यांच्याकडे होती.
निवडणूक प्रक्रियेला गती (Gujarat Elections 2026 Preparation)
गुजरातमधील प्रमुख शहरांमध्ये लवकरच महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. त्यानंतर विधानसभा निवडणुकांचीही प्रक्रिया सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेचे सशक्त नियोजन आणि पारदर्शक अंमलबजावणी ही मोठी जबाबदारी सागळे यांच्या खांद्यावर असणार आहे.
शिस्तप्रिय आणि रोखठोक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या संदीप सागळे यांच्या नियुक्तीमुळे निवडणूक प्रक्रियेला अधिक गती आणि पारदर्शकता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा:

























