Maharashtra Akola News: अकोला जिल्ह्यातील (Akola District) पातूर तालुक्यातल्या आलेगावातील एका प्रकरणानं खळबळ उडाली आहे. गावातील एका हिंदू दलित तरूणाच्या मुस्लिम धर्मात धर्मांतरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या मुलाचं धमकावून धर्मांतर झाल्याचा आरोप त्याच्या आईनं केला आहे. दरम्यान, चान्नी पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटीसह धमकावण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


संबंधित तरूणानं 21 नोव्हेंबर 2022 रोजी इस्लाम कबूल केल्याचं शपथपत्रावर लिहिलं आहे. धर्मांतरणानंतर तो आपलं नाव आता 'मोहम्मद अली' असं सांगत आहे. शुभमचं धर्मांतरण बुलढाणा जिल्ह्यातील उंद्री गावातील मदरशात झाल्याचं त्याच्या आईनं म्हटलं आहे. आपल्या मुलाला गावातील अल्ताफ गादीवाले, अन्सार गादीवाले, शेख तन्वीर, शेख अजीम शेख मंजूर या चौघांनी दबाव आणि पैशाचं आमिष दाखवत धर्मांतरण घडवून आणल्याचा गंभीर आरोप मुलाच्या आईनं केला आहे. 


नेमकं कसं झालं धर्मांतरण? 


पातूर तालुक्यातील आलेगाव येथील एका महिलेने 12 जुलैला चान्नी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आठ महिन्यांपूर्वी त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या अल्ताफ गादीवाले, अन्सार गादीवाले यांनी आपल्या मुलाला कामासाठी हैदराबाद येथे नेलं. तिथे मुलाचा फोन लागत नव्हता. हैदराबाद इथं दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहिलं असता तिथेही मुलगा सापडला नाही. तो बुलढाणा जिल्ह्यातील उंद्री येथील एका मदरशामध्ये असल्याची माहिती मिळाली. तिथं गेली अन् मुलाची चौकशी केल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण, त्यांचा मुलगा स्वत:ची ओळख 'मोहम्मद अली' असं सांगत होता. त्यानंतर त्याचे आई-वडील त्याला गावी आलेगाव येथे घेऊन आले आहेत. मुलगा घरी आल्यानंतर त्याच्या खिशामध्ये धर्मपरिवर्तन केल्याची कागदपत्रं आढळून आली होती. त्याच्याजवळच्या शपथपत्रात त्यानं 21 नोव्हेंबर 2022 रोजी मुस्लिम धर्मात धर्मांतरण केल्याचा उल्लेख आहे. 



'त्या' चौघांकडून मुलाच्या कुटुंबियांना धर्मांतराचे आमिष आणि धमकीचा आरोप 


यासंदर्भात धर्मांतरण करण्यात आलेल्या मुलाच्या आईनं अल्ताफ गादिवाले, अंसार गादिवाले, शेख तजवीर, शेख आजीम शेख मंजूर यांना मुलाच्या धर्मपरिवर्तनासंदर्भात जाब विचारला. त्यावर त्यांनी 'तुम्ही टेंशन घेऊ नका' असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर चारही आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येत त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि अख्ख्या कुटुंबाचं धर्मांतरण करून टाका तुम्हाला चांगले पैसे देण्यात येतील, असं आमिषही दिलं, असा आरोप मुलाच्या आईने केला आहे. दरम्यान मुलाच्या आईच्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी चारही आरोपींविरूद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.


तरुणाचं शपथपत्रावर धर्मांतर


या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता संबंधित तरूणानं दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी म्हटलं आहे की, आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता स्वतःचं धर्मांतर केलं असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. तरीही या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं चान्नी पोलीस म्हणतात. 


गावात गादीवाले बंधूंच्या माध्यमातून अनेकांचं मुस्लिम धर्मात धर्मांतर?  


याच गावात अन्सार आणि अल्ताफ गादीवाले या आरोपींच्या माध्यमातून आतापर्यंत मागच्या वर्षभरात पाच लोकांनी धर्मांतरण केल्याचा आरोप बजरंग दल आणि मुलाच्या आईनंही केला आहे. यात एकाच कुटुंबातील चार लोकांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासोबतच गावातील एका दलित तरूणाचंही मुस्लिम धर्मात धर्मांतर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


गावातील धर्मांतरणाचे आंतरराष्ट्रीय 'तार' 


या प्रकरणाशी आंतरराष्ट्रीय तार जुळल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं केला आहे. या गावात पैशाचं, नोकरीचं आणि लग्नाचं आमिष दाखवत अनेक तरुणांचं धर्मांतरण केलं जात असल्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप बजरंग दलाचे विदर्भ प्रांत सहसंयोजक सुरज भगेवार यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला गेला पाहिजे, या प्रकारासाठी फंडिंग कुठून येतं, नोकरीच आमिष दिले जाते तर ते संस्था कुठल्या आहेत, नोकरी देणाऱ्या संस्था देखील शोधल्या गेल्या पाहिजेत. विशेष म्हणजे, धर्मांतर करण्यासाठी जे लोक आमिष देत आहेत त्यांच्यावर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण या प्रकरणावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असे गावात सुरू असल्याचा आरोपही सुरज भगेवार यांनी केला आहे, या संपूर्ण प्रकरणाचा म्होरक्या कोण आहे? हे शोधलं गेलं पाहिजे असेही ते म्हणाले. धर्मांतर करण्यासाठी हे फंडिंग विदेशातून येत असल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे. 


प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल 


या प्रकरणाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना अकोला पुर्वचे आमदार रणधीर सावरकरांनी दिली. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्याशी फोनवरून संवाद साधत माहिती घेतली. याप्रकरणाची सखोल चौकशी करीत प्रकरणातलं सत्य बाहेर आणण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच या गावातील इतर धर्मांतरणाच्या प्रकरणांचीही चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 
दरम्यान, संविधानाने सर्वांना धर्मस्वातंत्र्य दिलं. मात्र, प्रलोभनं आणि धमक्या देऊन धर्मांतरण होत असेल तर असे प्रकार गंभीर आहेत. या प्रकरणातील सत्य शोधत या धर्मांतरणाचं खरं तथ्य अकोला पोलिसांनी समोर आणणं गरजेचं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Akola Rain Updates: अकोल्यात धुवांधार पाऊस; पुरात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह तब्बल तेरा तासांनी सापडला