अकोला : शिक्षक हा त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी कायम 'आयडियल' अन 'आयडॉल' असलेला माणूस... परंतू, अकोल्यातील (Akola) एक जिल्हा परिषद शिक्षक त्यांच्या विद्यार्थी अन पालकांसाठी 'आयडियल' तर झालाच आहे. मात्र, कठोर व्यायाम करून शरीर कमवू पाहणाऱ्या 'बॉडी बिल्डींग'मधील तरूणाईसाठीही हा शिक्षक अक्षरश: 'आयडॉल' बनलाय. संतोष पाचपोर असं या शिक्षकाचं नाव आहे. ते अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी खुर्द जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. द्विशिक्षकी असलेली आपली शाळा (School) त्यांनी आपल्या सहकारी शिक्षक आणि गावकऱ्यांच्या मदतीनं शिक्षण अन उपक्रमामधून सर्वार्थाने सुंदर केलीये. पाहूयात, 'जीम' ते 'शाळा' या माध्यमातून 'बॉडी बिल्डींग' ते 'नेशन बिल्डींग' अशी समृद्ध 'पॅशन' जगणाऱ्या एका ध्येयवेड्या 'गुरूजी'चा प्रवास उलगडवणारी हा गोष्ट आहे. 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निंबी खुर्द, तालुका, बार्शीटाकळी, जिल्हा, अकोला येथील सहायक शिक्षक संतोष पाचपोर. निंबी गावाची लोकसंख्या जेमतेम एक हजाराच्या घरात. तर पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेत 21 विद्यार्थी. मात्र, हेच 21 विद्यार्थी या शाळेवरील शिक्षक संतोष पाचपोर अन् समाधान जावळे यांचं संपूर्ण भावविश्व बनले आहेत. त्यातूनच, ही शाळा खऱ्या अर्थाने 'मस्ती की पाठशाला' बनलीय. कारण, या शाळेत अनुभवातून दिलं जाणारं आनंदी शिक्षण आहे. येथील विद्यार्थ्यांना खर्व, अब्जांशी नातं सांगणारी 27 अंकी संख्या अगदी लिलया वाचता येतेय. मराठी, इंग्रजी वाचता लिहिता येतंय. छान कविताही म्हणता येतात... पाढे येतात... तर शाळेच्या मैदानावर विविध खेळांची धमाल असते. शाळेत झाडांना मोठं होत पाहण्याचा आनंद, शाळेतील परसबागेतल्या भाजीपाल्यातून शिजलेला शालेय पोषण आहारातील जेवणाचा आनंद.. हे जगण्यातला सारं समृद्धपण या शाळेत विद्यार्थ्यांना मिळतंय. हे सारं तन्मयतेनं शिकविणारे असतात त्यांचे दोन शिक्षक संतोष पाचपोर अन समाधान जावळे 'गुरूजी'.... 




बिल्डरलाही लाजवेल अशी गुरुजींची बॉडी


मात्र, याच वर्गात शिकवणाऱ्या संतोष पाचपोर गुरूजींचं एक 'वेगऴं' अन् 'हटके' रूप पाहून... नि़बीतील वर्गात तन्मयतेनं शिकवणारे शिक्षक हाच 'बॉडी बिल्डर आहे का?, असा प्रश्न तुम्हाला पडेल. असं सांगितल्यास तुमचा विश्वासही बसणार नाहीय. मात्र, हे अगदी खरं आहे. वर्गात 'शिक्षक' असणारे संतोष गुरूजी 'जिम'मधील 'ट्रेनर सरां'चे लाडके अन आज्ञाधारक विद्यार्थी आहेत. सकाळी 4 वाजतापासून आपला दिवस सुरू करणारे संतोष सकाळी 5 वाजता 'जीम'मध्ये असतात. सूर्यनमस्कार, पुशअप्स, रनिंग, वॉकींग, वेटलिफ्टिंग यांसह सारे-सारे व्यायाम ते घामाने अक्षरश: ओलेचिंब होईपर्यंत करतात. संतोष पाचपोर हे अकोला जिल्ह्यातील नामवंत 'बॉडी बिल्डर' म्हणून ओळखले जातात. 'जीम'मध्ये ते अतिशय मेहनत घेणारे विद्यार्थी म्हणून ओळखले जातात. म्हणूनच त्यांचे 'जीम ट्रेनर त्यांच्यावर प्रचंड खुश असतात.


संतोष पाचपोर आणि समाधान जावळे हे दोघेही 2018 मध्ये सोबतच जिल्हा परिषदेच्या निंबी खुर्दमधील शाळेवर रूजू झालेत. त्यावेळी गावालगतच्या माळरानावर दोन खोल्यांची असलेली शाळा अक्षरश: गवत अन झुडूपांनी वेढलेली. सर्वांत आधी या शिक्षकांनी शिक्षणासोबतच शाळेचं रूपडं बदलण्याचा चंग बांधला. गेल्या सात वर्षांत दोघांनी आपल्या खिशातून जवळपास पाच लाखांची पदरमोड केलीय. त्यानंतर गावकऱ्यांनी एक लाखांची लोकवर्गणी केलीय. त्यातूनच कधीकाळी ओसाड असलेली शाळा आज विद्यार्थी, झाडं, फुलं, पक्षी, फळं अन पालेभाज्या किलबिलाट अन हिरवाईनं पार बदलून गेली आहे. 




युट्यूबवर 25 कोटी व्हूज


शाळेत शिक्षणासोबतच अनुभव आणि सण-उत्सव आणि खेळांना सारखंच महत्व दिलं जातं. त्यामुळेच शाळेत रंगपंचमी, दहिहंडी यासोबतच शनिवारी रनिंगचा आनंदही विद्यार्थी घेत असतात. परसबागेतील केळीची चव त्यांना सुखावते. चांद्रयान प्रक्षेपणावेळी शाळेत शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना दाखविलेल्या प्रातिकृतिक यान प्रक्षेपण व्हिडीओला युट्यूबवर 25 कोटी लोकांनी पाहिल्यांनं ही शाळा अन दोन्ही शिक्षक देशभरात चर्चेत आले होतेय. वर्गात या दोन शिक्षकांच्या आनंददायी आणि अनुभवसंपन्न शिक्षणामुळे विद्यार्थी नवोदय आणि शिष्यवृत्ती परिक्षेत मोठं यश संपादन करत आहेत. त्यामुळे आता पुण्यातील सेवा सहयोग आणि अकोल्यातील सेवा बहुउद्देशीय संस्था या दोन संस्थांनी या शाळेला शैक्षणिक साहित्यासाठी दत्तक घेतलंय. त्यामूळे विद्यार्थी आणि पालक आपल्या दोन्ही शिक्षकांवर प्रचंड प्रेम करतात. 




दरम्यान, सध्या राज्यातील जिल्हा परिषद शाळा शेवटच्या घटका मोजतायेत, हे दुर्दैवी वास्तव आहे. मात्र, या अंधारल्या वाटेवरही काही हसरे दुवे शोधणारे शिक्षक आजही एखाद्याा दीपस्तंभासारखं काम करतायेत. 'बॉडी बिल्डर' संतोष पाचपोर गुरुजी यांचं कार्य म्हणूनच कोणत्याही शब्दांच्या पलीकडचा ठरतं. 'बॉडी बिल्डिंग' ते विद्यार्थी घडविणाऱ्या 'नेशन बिल्डिंग' या संतोष पाचपोर गुरुजींच्या जगावेगळ्या 'पॅशन'ला अनेकांनी सॅल्यूट केलाय.