अकोला : शहरात घडलेल्या बलात्काराच्या गंभीर प्रकरणानंतर प्रशासन आक्रमक भूमिकेत उतरल्याचं दिसून आलं. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींच्या दुकानावर अकोला महानगरपालिकेच्या तोडक पथकाने बुलडोझर चालवत तातडीची कारवाई केली. उत्तर प्रदेशात गुन्हेगारी प्रवृत्तीवर ज्या पद्धतीने बुलडोझर कारवाई पाहायला मिळाली, त्याच धर्तीवर अकोल्यातही कठोर पाऊल उचलण्यात आल्याचे चित्र दिसून आले.
दोन दिवसांपूर्वी डाबकी रोड परिसरातील एका विवाहित महिलेने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आरोपींनी अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणात रहमान ऊर्फ मोहम्मद मुस्तफा सलीम तेली, मोहम्मद इब्राहिम ऊर्फ बाबू सलीम तेली, इब्राहिम (गॅरेजवाला) आणि चंदू वानखेडे यांच्याविरुद्ध बलात्कारासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
Akola Rape Case : महिलेवर दुकानात अत्याचार
पीडितेच्या तक्रारीनुसार, ‘परी बिंदी घर’ या दुकानात बलात्काराची ही घटना घडली. हे दुकान गांधी रोड, सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या मागे आहे. याच ठिकाणी पीडितेशी अश्लील वर्तन करून तिचा व्हिडीओ काढण्यात आला आणि त्यानंतर जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींबाबत पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, हे प्रकरण संवेदनशील असून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अकोला महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पुढाकार घेतला.
Akola News : दुकानावर तोडक कारवाई
गांधी रोड, सिटी कोतवालीच्या मागे असलेल्या ‘परी बिंदी घर’ तसेच लगतच्या अवैध दुकानांवर महानगरपालिकेच्या तोडक पथकाने बुलडोझरच्या सहाय्याने कारवाई केली. महानगरपालिका प्रशासनाने ही कारवाई अवैध अतिक्रमणाविरोधात असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तींच्या दुकानावरच ही कारवाई झाल्याने शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात कडक संदेश गेला आहे.
स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, उत्तर प्रदेशातील ‘बुलडोझर’ कारवाईच्या धर्तीवर अकोल्यातही गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, सिटी कोतवाली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ही बातमी वाचा:
