अकोला: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल (Congress Leader Hidayat Patel) यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हिदायत पटेल यांच्यावर काल (6 जानेवारी) अकोल्यामध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहाळा गावात हल्लेखोराने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला (Akola Crime) केला होता. राजकीय आणि कौटूंबिक वादातून उबेद पटेल या तरूणाने हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. त्यांनतर मारेकरी फरार असून संशयित आरोपी उबेद पटेलला रात्री पणज गावातील लोकांनी पकडून दिलं आहे. अशातच अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान हिदायत पटेल यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. याप्रकरणी काही राजकीय वर्तुळातील नेत्यांची नावे समोर आली आहेत, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचं नाव आलं आहे.
आरोपींमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष
हिदायत पटेल हल्ला प्रकरणातील आरोपींमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे आणि काँग्रेस नेते अन् जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे यांच्या नावाचा समावेश आहे. अकोट ग्रामीण पोलिसांत 5 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचे गुन्हे दाखल होतात का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत मोठी नाव समोर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल हल्ला प्रकरणात पाच आरोपींवर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री पाच आरोपींवर खुनाचा प्रयत्न करीत कट रचल्याचा आरोप असल्याने गुन्हे दाखल करण्यात आला होता. पटेल कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत. आता हिदायत पटेलांच्या मृत्यूनंतर गुन्ह्यात खुनाची कलमं वाढणार का?, याकडे लक्ष लागलं आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत मोठी नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हिदायत पटेल यांच्यावरील हल्ल्याला कारणीभूत असल्याचा आरोप केलेल्या नावांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते संजय बोडखे, काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांची आरोपींमध्ये नावे आहेत.
याशिवाय हल्लेखोर आरोपी उबेद पटेल आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अकोट ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे . काल अकोट तालूक्यातील मोहाळा गावात हिदायत पटेल यांच्यावर उबेद पटेल या तरुणाने हल्ला केल्यानंतर आज सकाळी पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हल्लेखोर आरोपी उबेद पटेलला रात्री अकोट तालुक्यातल्या पणज गावातून अटक केली आहे. गुन्ह्यात मोठ्या राजकीय नेत्यांची नावे असल्याने अकोला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हल्ला आणि कट रचल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता खुनाचा गुन्हा किती लोकांवर दाखल होतो? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
मशिदीत नमाज पाडून बाहेर पडताच प्राणघातक हल्ला
हिदायत पटेल हे काल (मंगळवारी) दुपारच्या दोन वाजताच्या नमाजनंतर मोहाळा गावातील मशिदीत नमाज पाडून बाहेर येत असताना उबेदने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केला आहे. पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर वार केले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र हल्ल्यात जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र अखेर उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
कोण आहेत हिदायत पटेल?
-सध्या प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष. अकोल्यातील काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा-पटेल 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार. -पटेल 2014 मध्ये दुसर्या स्थानावर. तर 2019 मध्ये तिसर्या स्थानावर. -हिदायत पटेल जिल्ह्यातील मोठे सहकार नेते. 25 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक. -सध्या अकोट तालूका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष. -35 वर्षांपासून जिल्ह्यातील महत्वाच्या अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्या संचालक.