ना जात पाहिली, ना धर्म; 25 वर्षात अडीच हजार मुलींचा संसार थाटला;आई-बापाच्या मायेनं केलं कन्यादान
कैलास कोते यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा अधिक थाटात संपन्न झाला.

शिर्डी : गेल्या काही वर्षांत वंशाला दिवा पाहिजे म्हणून देशात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण चांगलेच वाढले होते. विशेष म्हणजे अभिनेता आमीर खानने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातूनही देशातील स्त्रीभ्रूण हत्येचं विदारक वास्तव समाजासमोर मांडलं होतं. दुसरीकडे सरकारकडून बेटी बचाव, बेटी पढाओ अभियान राबवत स्त्री जन्माचे स्वागत करण्याबाबत जागृती करण्यात आली. तर, कित्येक कुटुंब आजही पहली बेटी, धन की पेटी, मुलगी ही घरची लक्ष्मी मानत स्त्री जन्माचे मोठ्या उत्साहात स्वागत करत असतात. शिर्डीतील (Shirdi) कोते कुटुंबीयांनी देखील स्त्री जन्माच्या स्वागताचा वेगळाच आदर्श समाजाला घालून दिला आहे. स्वतःला मुलगी नाही मात्र गेल्या 25 वर्षात कैलास कोते व त्यांच्या पत्नीने सामुदायिक विवाह (Marriage) सोहळ्याच्या माध्यमातून हजारो मुलींचे कन्यादान करत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कैलास कोते यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा अधिक थाटात संपन्न झाला. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईंच्या शिर्डीतील या कोते दांपत्याने आत्तापर्यंत विविध धर्मातील अनेक मुलींचा कन्यादान केलंय. सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आजतागायत 2,500 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात हिंदु, मुस्लिम आणि बौद्ध धर्मीय अशी 65 जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. स्वतःला मुलगी नसल्याची खंत मनात असताना 25 वर्षांपूर्वी आईकडून प्रेरणा घेऊन कैलास कोते यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ हाती घेतली. प्रत्येक वर्षी मोठ्या थाटामाटात सर्वधर्मीय विवाह सोहळा संपन्न होतो आणि त्यामुळे कोते दाम्पत्याला हजारो मुलींचे आई वडील होण्याचे भाग्य लाभले आहे. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील वधू-वरांची संख्या लक्षणीय असते..
आईकडून घेतली प्रेरणा
गेल्या 25 वर्षांपासून शिर्डीत सुरू असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात अवघा एक रुपया शुल्क भरून नोंदणी करता येते. कोते दाम्पत्याकडून वधू-वरांना नवे पोशाख, सोन्याच्या मंगळसूत्राची भेट, संसार उपयोगी वस्तू, वऱ्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन दिले जाते. त्यासाठी कोते परिवार आणि नातेवाईक स्वतःच्या मुलींचे लग्न असल्याप्रमाणे तयारी करतात. यावर्षी 65 जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झालाय, असे कैलास कोते यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. ज्यांचा विवाह याठिकाणी पार पडला, त्यांच्या अपेक्षेपेक्षाही छान नियोजन करण्यात आल्याने वधू-वरही समाधानी होते. अवघ्या एक रुपयात संसाराची सुरुवात होत असल्याने वधू-वरांना आनंद झाल्याचे दिसून आले, असे कैलास यांच्या पती व आयोजक सुमित्रा कोते यांनी म्हटले.
महागाईमुळे कित्येकांना आधार देणारा सोहळा
या विवाह सोहळ्यात दरवर्षी मोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित असतात. एकीकडे वाढती महागाई आणि पाणी टंचाईच्या काळात 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' चा संदेश देणारा शिर्डीतील हा सामुदायिक विवाह सोहळा अनेकांना आधार देणारा ठरलाय एव्हढं मात्र नक्की, अशा भावनाही काही वर व वधूंनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा
अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेतलाच नाही; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं 2024 चं राज'कारण'






















