अहिल्यानगर : पक्षाच्या महामेळाव्याचे नियोजन करण्यासाठी शिर्डीतील बैठकीला जावं लागल्याने राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहता आलं नसल्याचा सूर आता भाजपच्या आमदारांनी लावला आहे. पण आता ही कसर भरून काढू आणि महायुतीच्या वतीने राम शिंदे यांचा सत्कार करू असं आमदार विक्रम पाचपुते यांनी जाहीर केलं.विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर शहरात शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र त्या सत्कार सोहळ्याला भाजपच्याच नेत्यांचीच अनुपस्थित असल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 


याबाबत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी प्रतिक्रिया दिली. शिर्डी येथे भाजपच्या होणाऱ्या महामेळाव्याच्या नियोजन बैठकीसाठी जावे लागल्याने शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला येता आलं नाही असं कर्डिले यांनी सांगितलं.  तर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी आपण खासगी घरगुती कार्यक्रमासाठी बाहेरगावी असल्याने सत्कार सोहळ्याला उपस्थित राहता आलं नाही असं सांगितलं. मात्र ही कसर भरून काढू आणि महायुतीच्या वतीने शिंदेंचा स्वतंत्र सत्कार सोहळा आयोजित केला जाईल असं त्यांनी सांगितलं. 


भाजपच्या आमदारांचीच अनुपस्थिती


अहिल्यानगर शहरातील माऊली सभागृहात राम शिंदे यांचा शनिवारी सर्वपक्षीय सत्कार सोहळा पार पडला. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते. तर पोपटराव पवार, आ. सत्यजित तांबे, आ. हेमंत ओगले यांच्यासह अनेक नेते या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. पण जिल्ह्यातील भाजपचे आमदार मात्र या सोहळ्याला उपस्थित नसल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली.


मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार मोनिका राजळे यांची या सत्कार सोहळ्याला उपस्थिती लावली नाही. शिर्डी येथे होणाऱ्या भाजप प्रदेश मेळाव्याच्या तयारीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक होत असल्याने सर्व आमदार त्या बैठकीसाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, भाजपच्याच नेत्यांची या सत्कार सोहळ्याला उपस्थिती नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. 


मी सांगेन तो आदेश आणि बोलेन तो कायदा


आपण आता विधानपरिषदेचे सभापती झालो, त्यामुळे पक्षाच्या बैठकीला जाऊ शकत नाही किंवा पक्षाची भूमिका मांडू शकत नाही असं अनेकांना वाटतं. पण तसा काही प्रोटोकॉल नसल्याचं राम शिंदे यांनी स्पष्ट केलं. आपल्याला सर्वकाही जमतं त्यामुळे यापुढे मी सांगेन तो आदेश आणि बोलेन तो कायदा असंच असेल असा इशारा राम शिंदे यांनी दिला. राम शिंदे यांनी हा इशारा आपल्याच पक्षातील आमदारांना दिला की नेमका कुणाला दिला याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे.


श्री क्षेत्र आगडगाव येथे आमदारांची लाडूतुला


राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आगडगाव येथे आमदार शिवाजी कर्डिले आणि आमदार विक्रम पाचपुते यांची रविवारी लाडूतुला करून त्यांचा सत्कार करण्यात आला. नगर, श्रीगोंदा आणि पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यावर असलेल्या या देवस्थानला सर्वच आमदारांचे नेहमीच सहकार्य असते. म्हणून ही लाडूतुला करण्यात आल्याचे देवस्थान समितीचे म्हणणे आहे. तर एवढ्या जागृत देवस्थानाकडून सन्मान होणं हे आमचं भाग्य असल्याचे आमदार पाचपुते यांनी म्हटले आहे.


ही बातमी वाचा: