संगमनेर : भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी संगमनेर (Sangamner) किंवा राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सुजय विखेंची खिल्ली उडवली. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर दिले आहे. 


बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांच्याबाबत म्हटले होते की, ते मोठ्याचं लाडकं लेकरू आहे. त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे. पक्षाने नाही तर तो पालकाने पुरवला पाहिजे. ते दोन ठिकाणी म्हटले आहेत. त्यांचा छंद पुरवण्यासाठी ते दोन्ही ठिकाणी उभे राहू शकतात. यामुळे बालकाचा छंद तर पुरा होईल, असे म्हणत त्यांनी सुजय विखे पाटलांची फिरकी घेतली होती.


मला शिकवण्याची गरज नाही


यावरून राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आमच्या मुलाचा किती छंद पुरावायचा, काय करायचं, हे मला बाळासाहेबांनी शिकवण्याची गरज नाही. तुम्ही आपल घरदार राजकारणात उतरवलच आहे. तुमच्या घरातल्या मुला-मुलींचा छंद पुरवला तो चालतो. दुसऱ्याच्या मुलाची का काळजी करता तुम्ही? संगमनेरमध्ये दहशतीच राजकारण फार वेळ चालणार नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी बाळासाहेब थोरातांना दिले आहे. 


तालुक्याला नवीन चेहरा हवा, अशी लोकांची भावना 


सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, डॉ. सुजय स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. मनात काय विचार केला त्यावर चर्चा नाहीए. पण जो निर्णय घेईल तो योग्यच असला पाहिजे. तालुक्यात हुकूमशहा तयार झालाय. तालुका पूर्ण उद्ध्वस्त केलाय. ठराविक लोकांचा विकास झालाय. तालुक्याचं काय झालंय? तालुक्याला नवीन चेहरा हवा, अशी आता लोकांची भावना झालीय. लोकभावनेचा काय आदर करायचा हे सर्व पक्ष श्रेष्ठींना कळवू. ते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.


काय म्हणाले होते सुजय विखे पाटील? 


शिर्डी विधानसभा ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल, अशी माझी अपेक्षा आहे. कारण पक्षाचा निर्णय होणे अद्याप बाकी आहे. तिकीट कोणाला मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे. पक्ष निर्णय घेईल, पक्ष त्यांना संधी देईल. आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारात साहेबच सर्वप्रथम असणार आहेत. राहिला मुद्दा माझा, आता मला बऱ्यापैकी वेळ आहे, त्यामुळे आजूबाजूंच्या मतदार संघाचा आढावा घेऊ, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले होते.


इतर महत्वाच्या बातम्या