अहमदनगर : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जनआक्रोश आंदोलन शुक्रवारी सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सूरु असून निलेश लंके यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मुक्काम ठोकला. आज दुसऱ्या दिवशीही निलेश लंकेंचे आंदोलन सुरूच असून या आंदोलनाची प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. 


शुक्रवारी रात्री निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच बसून कार्यकर्त्यांसह जेवण केलं. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेऊ, आज 500 ते 1000 गायी आणि शेळ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेऊन येणार असल्याचा इशारा निलेश लंके यांनी दिला आहे. तसेच वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपड्या टाकू, असेही त्यांनी म्हटले आहे. 


जिल्हा नियोजन बैठक ऑनलाईन ठेवल्याने लंकेंची नाराजी 


आज जिल्हा नियोजनची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार होती. या बैठकीला अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि खासदार यांची उपस्थिती असते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती. मात्र ही बैठक ऑनलाईन ठेवण्यात आल्याने निलेश लंके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 


आंदोलनस्थळी उभारली दुधाच्या कॅनची हंडी 


दरम्यान, जनआक्रोश आंदोलनाच्या ठिकाणी दुधाच्या कॅनची हंडी उभारण्यात आली आहे. त्याला कांद्याच्या माळा लावण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलन स्थळी जनावरांची गाडी आणण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याचे दिसून आले. त्यानंतर निलेश लंके यांनी थेट पोलिसांजवळ जाऊन जनावरांची गाडी आंदोलन स्थळी आणली आहे. आता निलेश लंकेच्या आंदोलनाची दखल प्रशासन कधी घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


आम्हाला भीक नको, हक्काचं द्या : निलेश लंके


शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना निलेश लंके यांनी प्रशासनाला इशारा दिला. निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाखाली यावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून आत जाऊ, असे त्यांनी म्हटले. तसेच सरकार आम्हाला 5 रुपये अनुदान देऊन भीक देत असून आम्हाला भीक नको हक्काचं द्या, अशी मागणी लंके यांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Nilesh Lanke : गळ्यात कांद्याच्या माळा, डोक्यावर गांधी टोपी, खासदार निलेश लंकेंचं बैलगाडीतून कांदा, दूध दरासाठी आंदोलन


दूध दरासाठी शेतकरी पुत्रांचे 6 दिवसांपासून आमरण उपोषण, दुधाला 40 रुपये हमीभाव देण्याची मागणी