अकोले : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहेत. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) राज्यभरात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे.  आज ही यात्रा अहमदनगर (Ahmednagar News) जिल्ह्याच्या अकोले येथे धडकली. या यात्रेच्या जाहीर सभेतून बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मविआच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब कधी होणार? याबाबत थेट तारीखच सांगितली. 


जयंत पाटील म्हणाले की, आगामी निवडणुकीत आपला उमेदवार निवडून यावा, यासाठी तुमचा उत्साह गरजेचा आहे. काल मोठा पाऊस सुरू झाला आणि इथे चिखल झाला होता. मात्र अमित भांगरे व युवकांनी पूर्ण काम केलं व आज सभा होत आहे. महाराष्ट्रातील 31 खासदार दिल्लीला आपण पाठवले. भाजपाला लक्षात आलंय आता त्यांचं सरकार येणार नाही. त्यामुळे तिजोरीचे दार उघडून पाहिजेत अशा घोषणा केल्या जात आहेत. सव्वा लाख कोटींचं कर्ज आम्हाला द्या, अशी मागणी सरकार आरबीआयकडे करत आहे. त्यांची लाडकी खुर्ची सोडेपर्यंत राज्यावर सव्वा 9 लाख कोटींचे कर्ज हे सरकार करणार आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. 


तुतारी हाती घेण्यासाठी राज्यात लोकांची मोठी स्पर्धा 


अमित शहा म्हणतात की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांना रोखा. या दोघांमुळे आपल सरकार जातंय हेच त्यांनी आता मान्य केलं आहे. भाजपचा एक नेता मला म्हणाला की लोक म्हणतात तूतारी हाती घ्या. सगळीकडे तुतारीची हवा आहे. म्हणून तुतारी हाती घेण्यासाठी राज्यात लोकांची मोठी स्पर्धा सुरू आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले. 


सरकार केवळ पैशांची उधळपट्टी करतंय


ते पुढे म्हणाले की, हे सरकार थकबाकीत गेलं आहे. सरकारने अनेक जीआर काढले मात्र काम होतील की नाही ही शंका आहे. आदिवासींच्या खात्यातून पैसे काढून या योजना सध्या हे सरकार चालवत आहे. हे सरकार केवळ पैशांची उधळपट्टी करत आहे. केवळ ठेकेदारांसाठी या योजना केल्या जात आहे, असा निशाणा जयंत पाटील यांनी यावेळी महायुती सरकारवर साधला. 


एक तारखेला मविआच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब 


महाविकास आघाडीच्या जागावाटपावर जयंत पाटील म्हणाले की, एक तारखेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. आम्हाला आघाडी टिकवायची आहे. त्यामुळे आज उमेदवाराची घोषणा करणार नाही आणि भाषण सुरू असताना घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला अकोलेचा उमेदवार कोण आहे हे अजूनही कळत नसेल तर त्याच्या बुद्धीची कीव येते, असे म्हणत अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी टोला लगावला. तर अमित भांगरे यांचे नाव न घेता एक प्रकारे जयंत पाटील यांनी उमेदवारीच जाहीर केली. 


चंद्राबाबू व नितेश कुमारांची पलटुराम म्हणून राजकीय ओळख


सध्या पितृपक्ष सुरू आहे. घट बसल्यावर मुहूर्त आहे. त्यामुळे उमेदवाराची घोषणा तेव्हाच होईल. स्वर्गीय अशोक भांगरे आज असते तर ते उमेदवार असते. कारण त्यांनी मागच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. शेतीमालाचे भाव वाढू द्यायचे नाही ही भाजपाची रणनीती आहे. कांद्याला भाव वाढला की हे लगेच कांदा आयात करतात. त्यामुळे 400 पार जाणारे लोक  240 वर थांबले. चंद्राबाबू व नितेश कुमार यांचा टेकू घेऊन सरकार स्थापन केले. पुढच्या वर्षभरात हे दोघेही पलटी मारतील. कारण यांची पलटुराम म्हणून राजकीय ओळख आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला टोला लगावला. 


नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे हीच आमची भूमिका


आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेपेक्षा चांगली योजना देणार आहोत. महिलांना पैसे देतात मात्र त्यांच्या सुरक्षेच काय? राज्यात कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवण्याचं काम सत्तेतील लोक करत आहे. गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात टेबलवर बसून पोलीस अधिकारी जुगार खेळतात. आधी अक्षय शिंदेने आत्महत्या केली सांगितलं. नंतर एन्काऊंटर झाल्याचं सांगितलं. नेमकं काय झालं हे आम्हाला माहित नाही. अशा नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे हीच आमची भूमिका आहे. मात्र ज्या शाळेत हा प्रकार घडला त्याची चौकशी केली का नाही? आम्ही गुन्हेगाराच समर्थन कधीच केलं नाही. मात्र त्याला मदत करणाऱ्या लोकांचा शोध घ्या ही आमची मागणी आहे, असे जयंत पाटलांनी म्हटले. 


लगता है राज्य मे चुनाव आ रहा है


2019 ला वर्गणी देऊन आमदाराला तुम्ही निवडून दिलं. आता इथे जेवढे हात वर केले त्या सगळ्यांनी सुद्धा अमितला वर्गणी द्यायची. आपल्या अकोलेसारखी हुशार माणसं महाराष्ट्रात सापडणार नाही. हे लोकसभेतील लीडमधून समोर आलंय. ज्याच्या मतदारसंघात पैसे दिले त्याला वीस पंचवीस टक्के घ्यायचा अधिकार दिला आहे. तिकडेच तुझं काम कर आमच्याकडे येऊ नको. सध्या कोणी गेलं तर लगेच योजना देतात कारण ते घाबरलेले आहेत. गरीब की थाली मे पुलाव आ रहा है. लगता है राज्य मे चुनाव आ रहा है, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.  


आणखी वाचा 


Ajit Pawar: 'मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण उपमुख्यमंत्रीपदावरच...', अजित पवारांचं मोठं वक्तव्य