शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या आदेशाविरोधात संताप उसळल्याचं दिसून आलं.

मुंबई : राज्यातील फडणवीस सरकारने अखेर जून महिन्यातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा (Farmer) निर्णय घेतला असून 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. मात्र, या कर्जमाफी योजनेत शासनाने अनेक अटी टाकल्या आहेत. त्यानुसार, लोकप्रतिनिधी खासदार ते नगरसेवक, सरकारी कर्मचारी, अधिकारी, 25 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार असलेल्या सरकारी किंवा अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे, या कर्जमाफी योजनेला शेतकरी संघटना आणि विरोधकांनी विरोध दर्शवला आहे. तसेच, ही योजना फसवी असल्याची टीकाही करण्यात येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केलीय.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या आदेशाविरोधात संताप उसळल्याचं दिसून आलं. जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करत किसान सभेने आदेशाची होळी केली. शहरातील महात्मा फुले चौकात मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र येत आंदोलन छेडलं. शासनाने सर्वांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि अटी रद्द कराव्यात अशी मागणी करत राज्यभर आंदोलनाची हाक किसान सभेकडून देण्यात आली आहे.
विजय वडेट्टीवारांकडून संताप, शेतकऱ्यांना लाभ नाही
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. कर्जमाफी मार्चपूर्वी द्यायला हवी होती, दोन लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा झाल्यावर वरील पैसे भरण्यासाठी शेतकऱ्याकडे कुठे पैसे आहेत? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आज झाला. मात्र, खात्यामध्ये पैसे कधी पडतील, त्याला किती कालावधी लागेल, जर खरीप हंगाम झाल्यावर ते पैसे खात्यात पडेल तर शेतकरी खरीप हंगाम करू शकणार नाही. म्हणून या कर्जमाफीचा फक्त देखावा होणार, याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. दरम्यान, थकीत असल्यामुळे शेतकऱ्यांना क्रॉप लोनही मिळालं नाही, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.
फडणवीस अन् मोदींच्या घोषणा फसव्या
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शेतकरी कर्जमाफीवर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस आणि मोदी यांच्या घोषणा म्हणजे फसवणुकीचा प्रकार आहे. प्रत्येक योजनेत ते लोकांना फसवत आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच, शेतकऱ्यांनी कडवट भूमिका घेऊन भाजपला मदत करू नये, असे आवाहनही राऊत यांनी केले.
हेही वाचा
शेतकरी कर्जमाफीसाठी कोण पात्र, कोण अपात्र, सरकारचे सर्व निकष सोप्या शब्दात!
Before You Go
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद























