अहमदनगर : एकीकडे चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस (Cotton) घरात साठवून ठेवला आहे. मात्र याचाच फायदा घेत चोरट्यांकडून कापूस चोरी केला जात आहे. अशीच घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याला जीव गमवावा लागला आहे. कापूस चोरीसाठी आलेल्या चोरट्यांकडून शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना पाथर्डी (Pathrdi) तालुक्यातील कडगाव शिवारात घडली आहे. या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. कारभारी शिरसाट असं या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 


अहमदनगर जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार (Nandurbar) आदी जिल्ह्यात कापसाचे उत्पादन घेतले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कापसाचे घसरल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काही जिल्ह्यात कापसाला फक्त सात हजार रुपये क्विंटल इतकाच भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश भागात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी (Cotton Farmer) कापूस घरात साठवून ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्याने कापूस घराच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवला होता. या कापसाच्या चोरीसाठी आलेल्या चोरटयांनी शेतकऱ्याला मारहाण केली. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडगाव शिवारातील मोहजबुद्रुक मिरी रस्त्यावर शिरसाठ यांची वस्ती असून येथे कारभारी रामदास शिरसाट हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शिरसाठ यांनी घराच्या बाजूलाच पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला कापूस चोरण्याचा उद्देशानं काही चोरटे शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या वस्तीवर आले. चोरटयांनी शेडमधील दहा-बारा कापसाच्या गोण्या या चोरट्यांनी उचलून नेत जवळच्या उसात नेऊन ठेवल्या. कापूस चोरून नेत असताना शिरसाट यांना जाग आली. आवाजाच्या दिशेने गेल्यानंतर सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी लागलीच चोरांना जाब विचारण्यास सुरवात केली. मात्र अज्ञात चोरटयांनी थेट शिरसाठ यांनाच मारहाण केली. या मारहाणीत कारभारी शिरसाठ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर 


ही घटना दुसऱ्या दिवशी शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यानंतर काही वेळातच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, डीवायएसपी सुनील पाटील, उपअधीक्षक प्रशांत खैरे यांनी देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यानंतर पोलिसांनी पथक तयार करून चोरट्यांच्या मागावर गेले आहेत. श्वानपथक, ठसेतज्ञ यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करून तपास यंत्रणेला मदत केली आहे. कारभारी शिरसाट अतिशय कष्टाळू आणि गरीब शेतकरी होते त्यांचा एक मुलगा सैन्य दलात आहे तर दुसरा इंजिनियर आहे. वडिलांच्या मृत्यूची माहिती समजताच इंजिनीयर मुलगा नगरहून कडगाव येथे आला. ऐन दिवाळीत शिरसाठ यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कडगावसह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Ahmednagar Drought : अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 96 महसूली मंडळ दुष्काळ सदृश्य जाहीर