SDRF boat capsizes in Pravara River : अकोले (Akole) येथे प्रवरा नदीपात्रात (Pravara River) एसडीआरएफ पथकाची बोट उलटल्याची (SDRF boat capsizes) धक्कादायक घटना गुरुवारी घडली. या घटनेत एसडीआरएफ पथकाच्या तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांचा अजूनही शोध घेतला जात आहे. आता सुगाव (Sugaon) येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा ताफा ग्रामस्थांनी अडवला आहे. 


बुधवारी दुपारी अकोले (Akole) तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीपत्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (25) व अर्जुन रामदास जेडगुले (18) हे दोघे तरुण बुडाले. या दुर्घटनेतील सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला होता. मात्र अर्जुन जेडगुले याचा शोध बुधवारी उशिरापर्यंत सुरु होता. या तरुणाचा शोध घेण्यासाठी गुरुवारी एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र एसडीआरएफ पथकाची बोट आज सकाळी उलटली. या पथकातील पाच जण आणि स्थानिक असे एकूण सहा जण प्रवरा नदी पात्रात बुडाले. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले आहे. तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अर्जुन जेडगुले आणि स्थानिक नागरिक गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे) यांचा शोध घेतला जात आहे.  


राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा अडवला


प्रवरा नदीत युवक आणि SDRF जवानांचा बुडून मृत्यूची घटना घडल्यानंतर स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. स्थानिकांनी अकोले गावातील सुगाव येथे राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा अडवला. दोन जणांचा अद्यापही शोध न लागल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. नदीतील पाण्याचा प्रवाह अद्याप का कमी केला नाही ? असा सवाल स्थानिकांनी पालकमंत्र्यांना विचारला. तसेच बचाव कार्य धिम्या गतीने सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आला आहे. 


प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनेचा थरार


दरम्यान, या दुर्घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी सुगाव गावचे पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की, नदीपात्रात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी सकाळी एसडीआरएफचे पथक गावात दाखल झाले. त्यांची शोधमोहिम साडेसहा वाजेच्या सुमारास सुरू झाली होती. एसडीआरएफ पथकाच्या दोन बोट पाण्यात उतरल्या. काही वेळाने एक बोट पाण्याच्या भोवऱ्यात सापडल्याने क्षणार्धात बोट उलटली. बुडालेल्या बोटीतील जवान पोहण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांना वरती येता आले नाही, असे त्यांनी म्हटले. 


आणखी वाचा 


नाशिक, प्रवरा, उजनी आणि राज्यात 22 जणांचा बुडून मृत्यू, सात दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरला!