Ahilyanagar News : खेळत असताना चार वर्षांचा -चिमुकल्याचा अंगावर दगड पडून त्यात त्याचा मृत्यू झाला. सार्थक नवनाथ गोलवड (रा. शिराढोण, ता. अहिल्यानगर) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. शिराढोण गावामध्ये सोमवारी (१२ मे) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक गोलवड हा सोमवारी दुपारी आपल्या मित्रासोबत गावातील सिना नदीच्या काठावर खेळत असताना, अचानकपणे त्याच्या अंगावर मोठा दगड पडला. त्यामुळे तो बेशुध्द झाला. घटनास्थळी उपस्थित असलेले सुनील दरेकर (रा. शिराढोण) यांनी त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे नेले.
उपचारासाठी नेलं, पण...
मात्र, दुपारी 2.50 वाजता रूग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून त्याला औषधोपचार सुरू होण्याआधीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांनी रूग्णालयात ड्यूटीवर असलेल्या तोफखाना पोलिसांना दिली. त्यांनी अहिल्यानगर तालुका पोलिसांना दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी तालुका पोलिसांनी भेट दिली आहे. दरम्यान, सदर घटना कशी घडली? आणि नेमकी कोणती परिस्थिती होती? याची अधिक चौकशी सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शिराढोण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरुणाला मारहाण
दरम्यान, विळद घाट (ता. अहिल्यानगर) येथे आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका तरुणावर लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. 12) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. मारहाण झालेल्या तरुणाचे नाव जगदीश पांडुरंग चव्हाण असे आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम ईश्वर साळुंके आणि एका अनोळखी इसमाविरुद्ध ही तक्रार दाखल झाली आहे. सोमवारी सायंकाळी ते विळद घाट परिसरात असताना ओम साळुंके याने "तू माझ्या वडिलांचे पैसे कधी परत करतोस?" या कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने फिर्यादीस शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने पोटावर व पाठीवर मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीनेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या