नागपूरः कोरोनामुळे ऑनलाईन होत असलेल्या परीक्षा यंदा प्रथमच ऑफलाईन आणि बहुपर्यायी (एमसीक्यू) पद्धतीने होत आहे. यातच विद्यार्थ्यांना थेट गुरुजीच उत्तरे सांगत असल्याने सुमारे 70 विद्यार्थ्यांनी गुरुजींनी सांगितलेले पर्याय निवडल्याने नापास होण्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर आली आहे.


शहरातील एका महाविद्यालयातील इंग्रजीच्या शिक्षकांनी सांगितलेल्या चुकीच्या उत्तरांवर विश्वास ठेवल्याने नापास होण्याची नामुष्की आली आहे. बीएच्या सहा सेमिस्टरमधील अनिवार्य इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची चुकीची उत्तरे सांगितल्याने हा प्रकार घडला आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीने उत्तरे सोडविणे चांगलेच महागात पडले.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उन्हाळी परीक्षेवेळी हे प्रकरण घडले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका विद्यार्थ्यांलयाच्या 70 विद्यार्थ्यांनी 6व्या सेमिस्टरमध्ये इंग्रजी विषयात उत्तरीण होण्यासाठी कॉलेजच्याच शिक्षकाची मदत घेतली. या शिक्षकाने परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे सांगितली होती. प्रश्नपत्रिका बहुपर्यायी होती. पेपर झाल्यानंतर आपण यावेळी हमखास चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ असा विश्वास विद्यार्थ्यांना होता. मात्र त्यांचा आनंद दुसऱ्याच दिवशी दुःखात बदलला. शिक्षकांनी सांगितलेली सर्व उत्तरे चुकीची असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.


विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेनुसार महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले. महाविद्यालयाने विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेबाबत तक्रार केल्यानंतर गंभीर प्रकरण उजेडात आले. चौकशीमध्ये विद्यापीठाने पाठविलेली उत्तरपत्रिका बरोबर असल्याचे लक्षात आले. याबाबत विद्यापीठाच्या परीत्राविभागाशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता त्यांनी हे प्रकरण परीक्षेच्या गोपनीयतेशी जुळले असल्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.


...अन् डोक्यावर ठेवला हात!


6व्या सेमिस्टरमधील अनिवार्य इंग्रजी विषयाचा पेपर 10 जूनरोजी झाला. विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे येत नव्हती. त्यामुळे संबंधित शिक्षकाने थेट परीक्षा हॉलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितली. शिक्षकच उत्तरे सांगत असल्याने विद्यार्थ्यांनीही डोळे बंद करुन पेपर सोडविला. उत्तर पत्रिकेतही याबाबत नोंद केली. काही दिवसानंतर विद्यापीठातर्फे उत्तरे तपासण्यासाठी महाविद्यालयाला पाठविण्यात आली. यामध्ये दिलेली प्रश्नांची उत्तरे आणि शिक्षकाने सांगितलेल्या उत्तरात तफावत होती. हा प्रकार पाहून विद्यार्थ्यांनी डोक्यावर हात ठेवला.