मुंबई : सलमान खानच्या सिनेमात एकटा सलमान असला की त्याच्या चाहत्याचं भागतं. अत्यंत माफक अपेक्षा घेऊन त्याचे चाहते थिएटरमध्ये जातात. संपूर्ण सिनेमात त्याची चाल स्लो मोशनमध्ये वारंवार पाहता यावी.. सिनेमात एकदा तरी त्याने शर्ट काढून आपल्या शरीराचे मसल्स दाखवावेत आणि फायटिंग. बास्स. एवढं असलं की त्यानं बाकी काही केलं नाही तरी चालतं. हे या सिनेमात आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांसाठी चंगळ आहे. शिवाय सोनाक्षी आणि सई अशा दोन नायिकाही या भागात आहेत. सलमानचे स्टंट काबिले तारीफ आहे. शेवटी त्याने दाखवलेली तब्येतही टाळ्या वसूल आहे. पण सिनेमा म्हणून म्हणाल तर थिएटरमध्ये अनेकदा आपण खिळून न राहता आपली चुळबूळ सुरू होते. म्हणजेच, हा सिनेमा बऱ्याचदा कंटाळवाणा झाला आहे.
चुलबुल आता एसपी झाला आहे. तो ज्या गावात आहे तिथला गुंड त्याला भेटतो आणि त्याच्या लक्षात येतं की हा तर आपला जुना दुश्मन. मग त्यानंतर या दोघांची दुश्मनी सुरू होते आणि त्यातून दबंग 3 आकाराला येतो. ही गोष्ट आपल्याला नवी नाही कारण, ट्रेलरमध्ये ती सगळी गोष्ट दिसते. कळते. सलमानला बघायचं असेल तर ही ट्रीट आहे. पण जे रंजन, जी मजा दबंग बघताना आली होती ती इथे येत नाही. कारण याचा दिग्दर्शक आहे प्रभूदेवा. ते उत्तम नृत्य करतोच. पण दिग्दर्शकीय कौशल्याबाबत इथे शंका वाटते. अत्यंत टुकार सीनने सिनेमाची सुरूवात होते. एका सीनिअर सिटीझनच्या खिशात हात घालून तू खिशात गुलाबजाम का ठेवलेस.. असं विचारणं निव्वळ टुकारपणाचं लक्षण आहे. इथेच सिनेमाची उंची कळते. पुढे सलमानची एंट्री.. त्याची हाणामारी.. त्याचं टेकिंग डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. पण या हाणामारीनंतर पुन्हा जी गोष्ट सुरू होते ती भयानक कंटाळवाणी असल्यामुळे कधी एकदा पुढची हाणामारी सुरू होते असं वाटून जातं.
सिनेमाची गोष्ट खुद्द सलमान खान यांची आहे. यात पटकथेचा आभाव आहेच. त्यातही सिनेमा प्रेक्षणीय बनवला आहे तो महेश लिमये यांनी. सलमानेच हाणामारीचे सिक्वेन्स कडक झाले आहेत. सरप्राईज पॅकेज म्हणून सई मांजरेकरसोबत मेधा मांजरेकरही आहेत. सईचा हा पहिला सिनेमा असल्यामुळे तिच्याकडे अनेकांचं लक्ष असणार आहे. अर्थात सलमान खानची नायिका होणं हे तसं सोपं नाही. पण सई आत्मविश्वासाने त्याला सामोरी गेली आहे. अतिशय गोड दिसते या सिनेमात ती. तिच्यासह सोनाक्षी सिन्हा.. खलनायकाची भूमिका कऱणारा सुदिप आदी सगळी मंडळी आहेतच. त्यांची ही दखल घ्यायला हवी. दबंग ३ च्या गाण्यात दबंगवालंं गाणं जमून आलं आहे. शिवाय मुन्ना बदनाम हुआ ही गाणी लक्षात राहतात. पण इतर गाण्यांमुळे सिनेमा फार खेचला आहे. सोनाक्षी सिन्हाची बॅक टू बॅक येणारी दोन गाणी.. सलमानचं सतत तिच्यासोबत रोमॅंटक होत जाणं.. एका पॉइंटनंतर कंटाळवाणं होऊ लागतं. त्याच सिक्वेन्समध्ये सलमानची हाणामारी आली की पुन्हा ताजंतवानं वाटू लागतं. या प्रकारामुळे सिनेमा खिळवून ठेवत नाही. तर सतत मध्येमध्ये कंटाळवाणी चुळबूळ होत राहते.
यात लक्षात राहतो महेश लिमये. सलमानला देखणं दाखवण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. शिवाय, धुळीचे.. गाडीचे स्लोमोशन्स.. चुलबुल आणि बाली यांचा मोबाईलवर होणारा सामना.. त्यावेळी हालत्या लाईटमुळे त्याच्यावर आलेली शॅडो त्याने कमाल टिपली आहे. सिनेमाची गोष्ट कमकुवत असल्यामुळे या चुलबुलचा कणा अशक्त झाला आहे. म्हणूनच पिक्चरबिक्चरमध्ये या सिनेमाला आपण देतो आहोत दोन स्टार्स.
सलमानचे चाहते असाल,. त्याने काहीही केलं तरी ते पाहायला आवडत असेल तर सिनेमा आवर्जून बघा. पण सलमान आवडतो पण सिनेमाही चांगला हवा या मताचे असाल तर जरा थांबा... याने पांडेजी का स्वागत करने से पहले थोडा सोचविचार करिये.