मुंबई : भारतात दिवसही उजाडलेला नसताना साता समुद्रापलीकडे, एका अशा दिमाखदार सोहळ्याची सुरुवात झाली ज्याची साऱ्या कलाविश्वाला प्रतिक्षा होती. तो दिमाखदार सोहळा म्हणजे, यंदाचे 92 वे अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात Oscars 2020. अनेक नामांकीत कलाकारांनी यंदा आपलं नाव सुवर्णाक्षरांनी ऑस्करवर कोरलं आहे.


ऑस्कर पुरस्कार 2020 चा दिमाखदार सोहळा लॉस एन्जिलिसमधील डॉल्वी थिएटरमध्ये पार पडला. जगातील प्रत्येक कलाकाराचे ऑस्कर पुरस्कारांकडे लक्ष लागलेले असते. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात पॅरासाईट चित्रपटाचाच डंका दिसला.





ऑस्करचा नारळ फोडला तो ब्रॅड पीटनं. 'वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार ब्रॅड पीटला देण्यात आला. तर लॉरा डर्ननं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.





ऑस्करमध्ये सगळ्यांच्या भुवया उंचावल्या त्या दक्षिण कोरियाच्या पॅरासाईट चित्रपटाने बाँग जून हो यांच्या पॅरासाईट सिनेमाला ऑस्करचा बहुप्रतिक्षित असा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवणारा पॅरासाईट हा पहिला परदेशी भाषा चित्रपट आहे.





याशिवाय पॅरासाईटच्या खात्यात आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म, मूळ पटकथा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर मिळाला आहे. गंमत म्हणजे दिग्दर्शक म्हणून बाँग जून हो यांनी हे चारही पुरस्कार स्विकारताना त्यांच्या मातृभाषेत आभार व्यक्त केले.





यंदाच्या ऑस्करमध्ये सगळ्यात जास्त म्हणजेच 11 नामांकनं असलेल्या जोकर चित्रपटाच्या पारड्यात दोनच पुरस्कार पडले. त्यात एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा वॉकिन फिनिक्सला मिळालेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तसेच ओरिजनल स्कोअरच्या पुरस्कारावरही जोकरनं आपलं नाव कोरलं आहे.


याशिवाय, ज्युडी चित्रपटासाठी अभिनेत्री रेनी झेल्वेगरला सर्वोत्कृषट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर 1917 चित्रपटानं देखील पुरस्कारांची हॅट्रीक मारली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ध्वनीमिश्रण, सर्वोत्कृष्ट छायांकन आणि सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर '1917' या चित्रपटाला मिळाला आहे.