दिल्ली : दिल्लीतल्या विज्ञान भवनात 66 वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वर्षभरात अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या कलाकरांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिव्या दत्ता आणि सोनाली कुलकर्णी यांनी केलं. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार होते. पण आजारी असल्यानं महानायक अमिताभ बच्चन या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही.

दरम्यान अभिनेता विकी कौशल याला सर्जिकल स्ट्राईक सिनेमासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात आला. तर सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनाही गौरवण्यात आलं. अभिनेता आयुषमान खुरानाला 'अंदाधुंद' पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आलं. दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेशला ‘महानती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सामाजिक मुद्यावर भाष्य करणारा 'पॅडमॅन' सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. अक्षय कुमारनं पुरस्कार स्वीकारला. सर्वोत्कृष्ठ संगीत दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळी यांना पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळ्यात 'पाणी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पर्यावरणविषयक चित्रपट या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. आदिनाथ कोठारे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार 'भोंगा' या चित्रपटाला मिळाला तर श्रीनिवास पोकळेला 'नाळ' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

नवी दिल्लीत पार पडणाऱ्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला महानायक अमिताभ बच्चन अनुपस्थित राहणार आहेत. तब्येत खराब असल्याने आपण या सोहळ्याला गैरहजर राहणार असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन दिली. तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली आहे. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.