मुंबई : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या सिनेमामध्ये नेहमीप्रमाणे आमिरचा हटके लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सिनेमाचं एक पोस्टर आज रिलीज करण्यात आलं आहे. यो पोस्टरमध्ये आमिरने पगडी घातलेली आहे, तसेच त्याने दाढीही वाढवलेली दिसत आहे.


गेल्या काही दिवसांपासून आमिर वाढलेल्या दाढीमध्ये अनेकदा समोर आला होता. याशिवाय 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाच्या सेटवरील काही फोटोही समोर आले होते. आता सिनेमाचा ऑफिशियल फर्स्ट लूक समोर आला आहे. सिनेमाचा फर्स्ट लूकचा फोटो आमिरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. "सत श्री अकाल. मी लाल सिंह चड्ढा", असं आमिरने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.





आधी सिनेमाचा आकर्षक लोगो आणि आता सिनेमाचा फर्स्ट लूकमुळे सिनेमाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 'लाल सिंह चड्ढा' सिनेमा 2020 मध्ये ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे. आमिर खान सिनेमात एक पंजाबी व्यक्तीरेखा साकारत आहे.


'लाल सिंह चड्ढा' सिनेमा 1994 ला रिलीज झालेल्या रॉबर्ट जेमेकिसच्या ऑस्कर विजेत्या 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमावर आधारित आहे. 'फॉरेस्ट गम्प' सिनेमात टॉम हँग्स आणि रॉबिन राईट मुख्य भूमिकेत होते. 'लाल सिंह चड्ढा' सिनेमा वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि आमिर खान प्रोड्युस करत आहेत. अद्वैत चंदन या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.