Raja Shivaji Review: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) म्हणजे, अखंड महाराष्ट्राचं दैवत. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) स्वतः मराठी असल्यामुळे लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाचत आणि जाणून घेत आलाय. त्यामुळे छत्रपती शिवराय आणि त्यांनी गाजवलेला पराक्रम अत्यंत खास आहे. 'राजा शिवाजी' (Raja Shivaji Movie) सिनेमात पडद्यावर त्यांनी हा भाव ज्या ताकदीनं साकारला आहे, तो खरोखरंच कौतुकास्पद आहे. रितेश देशमुख यानं मराठी सिनेमात (Marathi Movie) आधीही उत्तम काम केलंय, मात्र यावेळी त्यांनी अभिनेता म्हणूनच नव्हे, तर लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
'राजा शिवाजी' सिनेमाचं कथानक (Raja Shivaji Script)
'राजा शिवाजी' सिनेमाची कथा प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन अनुभवण्यासारखी आहे. कथानकात बारकावे आहेत, सखोल संशोधन केलेलं दिसतंय. मराठी आणि मुघल यांच्यातील शत्रुत्व, राजकारण आणि स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला लढा, त्यांना आलेल्या अडचणी, हे सर्व अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलंय.
'राजा शिवाजी' सिनेमा कसाय?
रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा सिनेमा एकूणच प्रत्येक बाबतीत खरा ठरतो. सर्वात आधी लक्ष वेधून घेतं ते सिनेमा तयार करताना त्यासाठी करण्यात आलेलं संशोधन. अनेक नव्या गोष्टी प्रेक्षकांना समजतात. प्रत्येक पात्राला योग्य न्याय देण्यात आला आहे आणि इथे दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख उठून दिसतो. त्यानं स्वतःला पुढे न करता, संपूर्ण सिनेमाला उजाळा दिला आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक अनोळखी पैलू सिनेमातून समोर येतात. हा सिनेमा केवळ पराक्रम, युद्ध सांगणारा नाही, तर त्यांच्या महान कार्याची व्यापक कहाणी सांगतो.
शिवाजी महाराजांची युद्धनीतीही प्रभावीपणे दाखवली आहे, शत्रूवर थेट हल्ला करण्यापेक्षा त्यांच्या मनावर आधी आघात कसा केला जातो? हे उत्तमरीत्या या सिनेमात सादर करण्यात आलं आहे. सिनेमातील VFX च्या बाबतीत बोलायचं झालं तर, ते आणखी थोडं चांगलं होऊ शकलं असतं, पण कथानकाची ताकद आणि भावनिक बाजू इतकी भक्कम आहे की, या छोट्या-छोट्या उणिवा अजिबातच जाणवत नाहीत.
'राजा शिवाजी' सिनेमा रितेश देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनीनं ज्योति देशपांडे आणि जिओ स्टुडिओज यांच्या सहकार्यानं साकारला आहे. 'धुरंधर'नंतर जिओसाठी हा आणखी एक यशस्वी सिनेमा ठरू शकतो, विशेषतः मराठी प्रेक्षकांमध्ये.
एकंदरीत, हा सिनेमा म्हणजे एक अनुभव आहे. तो फक्त पाहायचा नाही, तर जाणून घ्यायचा आहे, कारण ही कहाणी अशा महान व्यक्तिमत्त्वाची आहे, ज्यांना देवासमान मानलं जातं.
सिनेमातल्या स्टार कास्टचा अभिनय (Raja Shivaji Star Cast)
रितेश देशमुखनं या सिनेमात लेखन आणि दिग्दर्शनासोबत अभिनयसुद्धा केला आहे. रितेश देशमुख यानं छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. रितेश देशमुखनं कमालीचं काम केलंय. रितेशची शरीरयष्टी या भूमिकेसाठी अगदीच साजेशी आहे, त्यानं स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी पूर्णपणे झोकून दिलंय. ही भूमिका साकारणं ही एक प्रचंड मोठी जबाबदारी होती आणि रितेशनं ती अत्यंत कौशल्यानं पार पाडली आहे. त्याचा हा अभिनय निःसंशयपणे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनयांपैकी एक ठरेल.
'राजा शिवाजी' सिनेमाबाबत सर्वात आकर्षणाची गोष्ट होती, सलमान खानचा 'कॅमिओ'. सलमानची एन्ट्री पडद्यावर होताच प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्यांचा वर्षाव होतो. संजय दत्तनं अत्यंत जबरदस्त अभिनय केलाय. तो खरोखरंच अत्यंत रौद्र आणि क्रूर वाटतो, इतका की, केवळ तो पडद्यावर येताच प्रेक्षकांच्या मनात संतापाची लाट उसळते. हेच त्याच्या अभिनयाच्या यशाचं खरं गमक ठरतं.
अभिषेक बच्चननं छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू संभाजी भोसले यांचं पात्र साकारलं आहे. त्यानं या भूमिकेत अक्षरशः प्राण फुंकले आहेत. अभिषेक इतका प्रभावी आणि भारदस्त यापूर्वी कदाचितच कधी दिसला आहे. विद्या बालनचा अभिनय उत्कृष्ट आहे. भाग्यश्रीनंही अतिशय सुंदर काम केलं आहे. जिनिलियानं सिनेमात महाराणी सईबाईंची भूमिका साकारली आहे. भूमिका जरी लहान असली, तरी ती प्रेक्षकांवर आपली छाप पाडते. अमोल गुप्तेचा अभिनय अप्रतिम आहे, तर जितेंद्र जोशीनंही आपली छाप पाडली आहे. सचिन खेडेकर यांचा अभिनय अत्यंत भव्य आणि प्रभावी आहे, तसेच, बोमन इराणी यांनीही आपल्या पात्राला पूर्णपणे न्याय दिलाय.
'राजा शिवाजी'चं लेखन आणि दिग्दर्शन (Raja Shivaji Direction)
'राजा शिवाजी' सिनेमाची खरी ताकद काय असेल तर, सिनेमाचं दमदार लेखन आणि रिसर्च. यावर खूप मेहनत घेतली गेली आहे आणि संपूर्ण सिनेमात तुम्हाला हे प्रकर्षानं जाणवतं, दिग्दर्शनाबाबत बोलायचं झालं तर, रितेश देशमुख आपली छाप पाडतो. त्यानं ज्या पद्धतीनं प्रत्येक पात्र पडद्यावर उमटवलंय, ते खरोखरंच कमाल आहे.
'राजा शिवाजी'चं संगीत (Raja Shivaji Music)
'राजा शिवाजी'च्या म्युझिक म्हणजे, सिनेमाचा आत्मा. अजय-अतुलनं सिनेमाला दिलेलं संगीत खरोखरंच अंगावर शहारे आणणारं आहे. प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारं संगीत खरंच दमदार आहे.
एकंदरीतच प्रत्येकानं अवश्य पाहावा असाच हा सिनेमा आहे...
रेटिंग : 3.5 स्टार्स
