Raj Kundra UT 69 Movie Review : 'यूटी 69' (UT 69) या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हा खतरनाक सिनेमा असेल याचा अंदाज आला होता. ट्रेलरमधील राज कुंद्राचा (Raj Kundra) अभिनय थक्क करणारा होता. पण ट्रेलर पाहिल्यानंतर 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' असं वाटून गेलं. राज कुंद्रा हे नाव आधी फक्त बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती म्हणून परिचित होतं. पण 2021 मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणामुळे तो चर्चेत आला. राज कुंद्राला 'यूटी 69' या सिनेमाच्या माध्यमातून आपली बाजू मांडायची असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा समज चुकीचा आहे. कदाचीत यामुळे तुम्हाला हा सिनेमा अपूर्ण वाटेल.
'यूटी 69'चं कथानक काय? (UT 69 Movie Story)
राज कुंद्राच्या आयुष्यावर भाष्य करणारा 'यूटी 69' हा सिनेमा आहे. राजने स्वत:ची भूमिका स्वत:च साकारली आहे. पोर्नोग्राफी प्रकरणामुळे राजचं आयुष्य रातोरात बदललं. पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला तुरुंगात फक्त 3-4 दिवस राहावे लागेल असं त्याला वाटलं होतं. पण त्याला तब्बल 63 दिवस तुरुंगात राहावे लागले. हे 63 दिवस आयुष्यभर त्याच्या लक्षात राहतील. राज कुंद्राचा तुरुंगातील संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे. राज कुंद्राची सुटका कशी होते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमाच पाहावा लागेल.
'यूटी 69' कसा आहे?
'यूटी 69' हा सिनेमा मनोरंजनात्मक आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहायलाच हवा. राज कुंद्राने 'यूटी 69' या सिनेमात त्याची बाजू मांडली आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहे. सिनेमा पाहताना तुम्ही निराश व्हाल. 'यूटी 69' या सिनेमाचं संपूर्ण शूटिंग तुरुंगात झालं आहे. एका कैद्याचा सकाळपासून रात्रीपर्यंतचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे. 40 लोकांऐवजी 250 लोक कसे तुरुंगात राहतात, चव नसलेलं जेवण अशा अनेक गोष्टी या सिनेमात पाहायला मिळतील.
'यूटी 69' हा राज कुंद्राचा डेब्यू सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून त्याने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग चांगला झाला आहे. राज कुंद्रासह इतर कैद्यांची निवडदेखील चोख आहे. सर्वांनीच आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.
'यूटी 69' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शाहनवाज अलीने सांभाळली आहे. सिनेमातील प्रत्येक फ्रेमवर मेहनत घेतली आहे. कथानक कंटाळवाणं नसल्याने सिनेमा पाहताना मनोरंजनाची मेजवानी मिळते. एकंदरीतच 'यूटी 69' हा सिनेमा मनोरंजक आहे.