Phule Review: सिनेमा आणि समाजाचा आत्मा जिवंत ठेवण्यासाठी 'फुले' गरजेचा; का पाहावा?
Phule Review: प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांचा 'फुले' हा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. जर तुम्ही हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी त्याचा रिव्यू वाचा.
Anant Mahadevan
Patralekha, Pratik Gandhi, Darsheel Safary, Vinay Pathak, Alexx O'Nell
Theaters
Phule Hindi Movie Review: आपल्या देशात धर्माच्या नावाखाली लोकांना एकमेकांमध्ये जुंपवून देणं सोपं आहे, म्हणून लोकांना शिक्षित करणं खूप महत्वाचं आहे. 'फुले' (Phule Movie Review) चित्रपटाच्या शेवटातला डायलॉग मनाला चटका लावून जातो. हा डायलॉग ऐकून आपण विचारात जातो की, आजपासून साधारणतः सव्वाशे वर्षापूर्वीच महात्मा ज्योतीराव फुले यांचे विचार किती प्रगल्भ होते. आज जे होतंय, ते थांबण्यासाठी ज्योतिबांनी तेव्हाच भाष्य केलं होतं. त्यामुळे ज्योतिबा तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य असूनही, सर्वसामान्य नव्हते, तर ते महात्मा ज्योतिराव फुले होते. त्याकाळातही त्यांनी सर्वसामान्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पोहोचवला. त्यासाठी अगदी नरकयातना भोगल्या, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण, लोकांना शिकवण्याचा घेतलेला वसा त्यांनी सोडला नाही.
आज जर तुमच्या, आमच्या घरातील स्त्रिया शिकून आपापल्या पायांवर खंबीरपणे उभ्या आहेत, तर त्या फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाईंमुळेच. या दोन सर्वसामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींचीच कहाणी हा सिनेमा सांगतो. 'फुले' सिनेमात कोणत्याही हिरोची धमाकेदार एन्ट्री नाही, मारामारी नाही, अॅक्शन नाही, थ्रिलही नाही, उत्तम पटकथा आणि साधीसुधी मांडणी. या सिनेमात जे दाखवलंय ते पाहण्यासोबतच त्याची जाणीव होणं गरजेचं आहे.
'फुले' सिनेमात ते काहीच नाही, जे आजच्या सिनेमांमध्ये असायलाच हवं, असं सर्वांना वाटतं. पण, 'फुले'मध्ये सिनेमाचा आत्मा आहे. ही फिल्म सांगते की, आजही उत्तम चित्रपट येतात, याचं तत्व जिवंत आहे, 'फुले'सारखा चित्रपट आपल्या सिनेविश्वासाठी आणि समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, असे चित्रपट आपल्याला सांगतात की, आपण जिवंत आहोत.
'फुले'ची पटकथा
'फुले' सिनेमाची कथा महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनगाथेवर आधारित आहे. ज्योतिबा फुले यांनी समाजातील अनिष्ठ प्रथा आणि परंपरांविरोधात आवाज उठवला. समाजाला धुडकावून त्यांनी सर्वात आधी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवलं. हे आता ऐकून आपल्याला फारच सामान्य वाटतं, पण फुलेंनी घडवलेली ही क्रांती त्या काळातली आहे, ज्या काळात समाजात बालविवाह, सती जाणं, विधवांचं मुंडन करणं यांसारख्या प्रथा राजरोसपणे सुरू होत्या. समाजातील मोठ्या वर्गाच्या विरोधाला न जुमानता महात्मा फुलेंनी हे सर्व कसं केलं? हे या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर उलगडतं. त्यामुळे प्रत्येकानं थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहणं गरजेचं आहे.
कसा आहे चित्रपट?
'फुले' हा एक अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे, काही लोकांना हा चित्रपट थोडा संथ वाटेल, पण हाच या चित्रपटाचा मूड आहे. ही कथा सुमारे 125 वर्षांपूर्वीची आहे, त्यामुळे मनःस्थिती तशीच ठेवण्यात आली आहे. चित्रपटात एकामागून एक असं काही ना काही घडत राहतं, ज्यामुळे तुमची उत्सुकता कायम राहते. अद्भुत अभिनय तुम्हाला चित्रपटात अडकवून ठेवतात. जेव्हा तुम्ही पाहता की, त्या काळात उच्च जातीतील लोकांना खालच्या जातीतील लोकांच्या सावलीवरही आक्षेप होता, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटतं.
हा चित्रपट समाजात प्रचलित असलेल्या वाईट प्रथा स्पष्टपणे दाखवतो, हा चित्रपट समानतेबद्दल बोलतो आणि ते अगदी ठामपणे मांडतो. आपल्या देशात असे वीर जन्माला आले याचा तुम्हालाही अभिमान वाटायला लागतो. हा चित्रपट कदाचित आजच्या चित्रपटांसारखा नसेल, पण हा चित्रपट पाहा कारण असे चित्रपट पाहणं महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण असे चित्रपट पाहत नाही. असे चित्रपट बनणार नाहीत आणि असे चित्रपट बनवणे हे सिनेमा आणि समाजासाठी खूप महत्वाचं आहे.
सिनेमातील अॅक्टर्सच्या अभिनयाबाबत थोडसं...
'फुले' चित्रपटातील दोन्ही मुख्य कलाकार, प्रतीक गांधी आणि पत्रलेखा, अद्भुत आहेत. दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी या सिनेमात केली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दोघेही राष्ट्रीय पुरस्कारास पात्र आहेत. प्रतीक गांधी प्रत्येक चित्रपटात आश्चर्यचकित करतो, या चित्रपटाचा प्रोमो येईपर्यंत मला विश्वासच नव्हता की, तो अशी भूमिका साकारू शकेल. प्रतीकनं हे पात्र पूर्ण प्रामाणिकपणे साकारलं आहे. प्रत्येकजण या भूमिकेत अगदी फिट बसतो, असंच दिसतंय. जेव्हा तुम्ही प्रतीकला ज्योतिबा फुले म्हणून पडद्यावर पाहता, तेव्हा तुम्ही त्याचं सर्व मागील काम विसराल आणि हे एका चांगल्या अभिनेत्याचं लक्षण आहे. ज्योतिबा फुले यांनी तरुणपणापासून वृद्धत्वापर्यंत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कशा पद्धतीनं जगले आहेत, हे प्रतीकनं हुबेहुब मोठ्या पडद्यावर उतरवलं आहे.
पत्रलेखानं ज्या पद्धतीनं सावित्रीबाईंचं पात्र साकारले आहे, त्याबद्दल तिचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. ती तुम्हाला सावित्रीबाई फुलेंसारखी दिसते, एका दृश्यात जेव्हा एक माणूस तिला धमकी देतो की, जर तिनं मुलींना शिकवणं थांबवलं नाही तर तो तिचा नवरा ज्योतिबा फुले यांना मारेल, तेव्हा पत्रलेखा त्याला एक गोष्ट सांगते आणि त्याला जोरदार चपराक मारते. कदाचित इथूनच समाजात महिला सक्षमीकरणाची सुरुवात झाली असेल. पत्रलेखाचा लूक, तिची साडी नेसण्याची शैली, तिचे हावभाव या सर्व गोष्टी तिला सावित्रीबाई बनवतात. चित्रपटाचा पहिला सीन तिच्या आणि तिच्या म्हातारपणापासून सुरू होतो आणि या सीनमुळे ती तुमच्या मनात सावित्रीबाईंची जागा कधी घेते, हे कळतंच नाही. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता, पण खरा पुरस्कार तेव्हा मिळेल जेव्हा मोठे चित्रपट निर्माते तिची प्रतिभा ओळखतील. पत्रलेखा ही अशी अभिनेत्री आहे, जिचा बॉलीवूड योग्य वापर करू शकलेला नाही किंवा तिच्यात कोणत्या पातळीची अभिनेत्री लपलेला आहे, हे कुणाला ओळखताच आलेलं नाही. आणि ही आपल्या चित्रपटसृष्टीची शोकांतिका आहे. अनेक चांगले कलाकार पुन्हा पुन्हा स्वतःला सिद्ध करत राहतात. पण कदाचित हा चित्रपट परिस्थिती बदलेल. या दोघांशिवाय, सर्व सहाय्यक कलाकारांनी त्यांचं काम उत्तम प्रकारे केले आहे आणि त्या काळाची झलक दाखवली आहे.
दिग्दर्शन
अनंत महादेवन यांनी 'फुले' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनंत हा एक उत्तम अभिनेता आहे आणि तो आणखी चांगला दिग्दर्शक असल्याचं सिद्ध करतो. त्यांचा मागील चित्रपट 'द स्टोरीटेलर' देखील अद्भुत होता आणि इथेही त्यांनी असा सिनेमा बनवला आहे, जो लक्षात राहील, जो आवश्यक होता. त्यांनी हा चित्रपट संतुलित पद्धतीनं बनवला आहे. जे काही आवश्यक आहे ते सांगितलं गेलं आहे आणि ते योग्य पद्धतीनं सांगितलं गेलं आहे. अनंत यांनी मुअज्जम बेग यांच्यासोबत मिळून हा चित्रपट लिहिला आहे.
म्युझिक
रोहन म्हणजेच, रोहन प्रधान आणि रोहन गोखले यांनी फिल्मच्या म्युझिकची जबाबदारी सांभाळली आहे. संपूर्ण सिनेमा पाहताना म्युझिकशी तुम्ही एकरुप होऊन जाता. म्युझिक चित्रपटाचा प्रभाव वाढवतात आणि थिएटरमधून बाहेर पडल्यानंतरही तुम्हाला ते ऐकावसं वाटतं.
























