छत्रपती संभाजी महाराजांमध्ये विविध गुण होते. ते कलासक्त होते, कविता करायचे, आदर्श पति, पिता होते, शूर तर होतेच तसेच कट्टर धर्माभिमानीही होते. त्यांच्या शौर्याने औरंगजेबालाही थक्क केले होते. असा एक छावा आपल्याकडे का नाही असा प्रश्न त्याला पडला होता. संभाजी महाराजांचे हाल हाल करून औरंगजेबाने त्यांना मारले, संभाजी महाराजांचा देहांत झाल खरा पण मनातून औरंगजेब खऱ्या अर्थाने हरला होता. हा सगळा इतिहास वाचून माहिती होता पण लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांनी हा इतिहास पडद्यावर अक्षरशः जीवंत केला आहे.


चित्रपटाची सुरुवात होते औरंगजेबाच्या दर्शनाने आणि पहिल्या फ्रेमपासूनच चित्रपट पकड घ्यायला सुरुवात करतो. संभाजी महाराजांचे शौर्य दाखवण्यास सुरुवात होते आणि शेवटपर्यंत आपण खुर्चीला खिळून बसतो. संभाजी महाराजांची संपूर्ण गाथा आणि त्यांचे सर्व गुण तीन तासांच्या चित्रपटात दाखवणे अवघड आहे. शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असला तरी चित्रपटात फक्त ९ वर्षांचाच कालावधी घेण्यात आला आहे.


शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याची सूत्रे हाती घेतात. शिवाजी महाराजांच्या निधनामुळे सुटकेच्या निश्वास घेणाऱ्या औरगंजेबापुढे संभाजी महाराज नवीन आव्हान उभे करतात. मुघलांचे बुऱ्हाणपूर लुटून संभाजी महाराज औरंगजेबाला ललकारतात. आणि तेथून औरंगजेब आणि संभाजी महाराजांमध्ये शह-काटशहाचा खेळ रंगतो. संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेब उत्तरेतून दक्षिणेकडे कूच करतो. मात्र आपल्या मावळ्यांच्या मदतीने संभाजी महाराज औरंगजेबाच्या सैन्याला सळो की पळो करून सोडतात. आणि मग नेहमी होते तसे घरचेच गद्दार शत्रूला सामील होतात आणि संभाजी महाराजांना मुघलांची सेना कैद करतो.


शिवाजी महाराजांविरुद्ध असलेले शत्रुत्व आणि संभाजी महाराजांनी नाकी नऊ आणल्याने संतापलेला औरंगजेब मग संभाजी महाराजांचा अतोनात क्रूर छळ करतो, मात्र हा छळ संभाजी महाराजा हस्त-हसत सहन करतात त्यामुळे औरंगजेब आणखी चिडतो, संतापतो, त्रस्त होतो.


दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपट कशा पद्धतीने चित्रित करायचा आहे हे अगोदरच ठरवलेले होते आणि त्यानुसारच त्यांनी पटकथेची मांडणी केली आणि अगदी तसेच चित्रिकरण केले. संभाजी महाराजांचे शौर्य त्यांनी अगदी उत्कृष्टरित्या सध्याच्या प्रेक्षकांना रुचेल आणि पटेल अशा पद्धतीने सादर केले आहे. चित्रपटाची शेवटची २० मिनिटे उतेकर प्रेक्षकांना खुर्चीत चुळबूळ करण्याचीही संधी देत नाहीत. चित्रपट संपतो तेव्हा प्रेक्षक महाराजांविषयीचे प्रेम स्वतःच्या हृदयात अधिक वाढवून डोळे पुसतच बाहेर पडतो. काही क्षण तर सुन्ही होतो. आणि येथेच उतेकर बाजी जिंकले.


उतेकरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कलाकारांची निवड. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाची निवड करणे हा एक अत्यंत योग्य  आणि स्तुत्य निर्णय. अक्षय खन्नाने औरंगजेब खऱ्या अर्थाने पडद्यावर जिवंत केलाय. आयुष्याच्या उताराला लागलेल्या औरंगजेबाची चिडचिड. संताप, क्रौर्य त्याने मोजक्याच घटनांमधून प्रखरपणे दाखवले आहे. कोठेही आरडाओरडा न करता शांतपणे त्याने क्रौर्य दाखवले आहे. म्हातारपणी औरंगजेब असाच असू शकेल असे वाटते. अक्षय खन्ना एक चांगला अभिनेता आहे मात्र त्याला त्याची क्षमता दाखवणारे चित्रपट मिळाले नाहीत असे हा चित्रपट पाहून वाटते.


दक्षिणेची अभिनेत्री रश्मिका मंदानाने संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. संभाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीत येसूबाई त्यांना पदोपदी साथ देत असतात. स्वराज्याची लढाई सोपी नाही हे येसूबाईंनाही माहित असते, कधीही काहीही होऊ शकते, मात्र प्रत्येक वेळी संभाजी महाराजांचे मनोबल आणखी वाढवण्याचा प्रयत्न करणारी येसूबाई रश्मिकाने चांगल्या प्रकारे साकारली आहे. शेवटी राजाराम महाराजांना गादीवर बसवतानाचा खंबीरपणाही रश्मिकाने चांगल्या पद्धतीने दाखवला आहे. संभाजी महाराज आणि येसूबाई यांच्यातील प्रसंगांची मांडणी चांगल्या पद्धतीने करण्यात आली आहे.


आणि विकी कौशल. संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलने कमाल केली आहे. खरे संभाजी महाराज असे असू शकतील असे वाटते. कोणत्याही भूमिकेत स्वतःला अक्षरशः झोकून देणे काय असते हे विकी कौशलने सरदार उधम सिंह, सॅम माणेकशा यांच्या भूमिका साकारताना दाखवून दिले होते. या चित्रपटात तर तो एक पाऊल आणखी पुढे गेलाय आणि संभाजी महाराजांना पडद्यावर जीवंत केलेय. संभाजी महाराजांचे शौर्य दाखवतानाच त्याने संभाजी महाराजांमधील एक पिता आणि पतीही उत्कृष्टरित्या दाखवला आहे. लढाईच्या दृश्यांमध्ये तर त्याने कमालच केली आहे. चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट विकी कौशल आहे.


अन्य  भूमिकांमध्ये दिव्या दत्ता (सोयराबाई), आशुतोष राणा (सरदार हंबीरराव), विनीत सिंह (कवी कलश), नील भूपलम (अकबर), डायना पेंटी (झीनत), प्रदीप सिंह (येसाजी कंक), संतोष जुवेकर (रायाजी), किरण करमरकर (अण्णाजी), सारंग साठ्ये (गणोजी), सुव्रत जोशी (कान्होजी) यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्कृष्टपणे साकारल्या आहेत


ए.आर.रहमानचे संगीत काही विशेष आहे असे म्हणता येणार नाही. आया रे तूफान गाण्यासह प्रत्येक लढाईच्या वेळेचे गाणे स्फूरण चढवणारे आहे. पार्श्वसंगीत काही ठिकाणी खूपच चांगले आहे, विशेषतः औरंगजेबाच्या एंट्रीवेळचे, मात्र काही ठिकाणी ते कानठळ्या बसवणारे झाले आहे.


एकूणच छावा हा चित्रपट प्रत्येकाने पाहिला पाहिजे असे माजे स्वतःचे मत आहे. लक्ष्मण उतेकरांनी संभाजी महाराजांची गाथा हिंदीत सादर करून संभाजी महाराजांना जगभरात नेण्याचे मोलाचे काम केले आहे त्याला आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे.