American Manhunt: Osama bin Laden | ओसामा बिन लादेनच्या खात्म्याची थरारक कहाणी!
Documentary : माणसाची जिद्द, बुद्धी, आणि देशभक्ती यांचं योग्य मिश्रण झालं, तर कोणतीही अंधारमय विचारसरणी संपवता येते.
Mor Loushy, Daniel Sivan
-
Netflix
पहलगामच्या घटनेनंतर 25 वर्षांनी, पुन्हा एकदा 9/11 ची आठवण मनाला चटका लावून गेली. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवर झालेल्या आत्मघाती विमान हल्ल्यांमध्ये तब्बल ३००० हून अधिक निरपराध लोक मृत्युमुखी पडले. त्या काळात मी फक्त पहिलीत होतो. दहशतवादी म्हणजे कोण, हेही खरं तर नक्की कळत नव्हतं. पण जसं जसं वय वाढत गेलं, नावं ऐकू यायला लागली ओसामा बिन लादेन, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, कसाब… आणि दहशतवादाच्या नृशंस चेहऱ्याशी आपलंही एक भावनिक नातं तयार झालं.
नेटफ्लिक्सवर आलेली American Manhunt: The Search for Osama bin Laden ही Documentary केवळ तीन भागांची आहे, पण तिचा परिणाम खोलवर जाणवतो. ही सिरीज 9/11 चा मास्टरमाइंड, अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनच्या खात्म्याची थरारक कहाणी सांगते. तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेतृत्वात, 2011 मध्ये अमेरिकेच्या SEAL TEAM 6 ने पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे अत्यंत गुप्त ऑपरेशन करून ओसामाचा खात्मा केला. ही सिरीज त्या शोधाचा मागोवा घेत, त्यामागील खऱ्या लोकांच्या आठवणींवर, त्यांच्या निर्णयांवर, मानसिक तणावावर प्रकाश टाकते.
या सिरीजचं खास वैशिष्ट्य म्हणजे ती कुठेही नाटकी वाटत नाही, अतिशयोक्तीचा आधार घेत नाही. CIA च्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या अनुभवांतून आणि फ्लॅशबॅक स्वरूपात सांगितलेल्या मिशनच्या टप्प्यांतून हा प्रवास अत्यंत गुंतवून ठेवतो. आपण फक्त प्रेक्षक राहत नाही, तर त्या टाईमलाईनचा भाग होतो. प्रत्येक अपयश, शंका, हळूहळू उलगडत जाणारा तपशील, आणि अखेरीस मिळवलेला विजय या सर्वात आपलीही धडधड वाढते.
भारतानेही अनेकदा दहशतवाद्यांचा सामना केला आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यापासून ते उरीच्या सर्जिकल स्ट्राईकपर्यंत आणि अगदी अलीकडील ऑपरेशन सिंदूर पर्यंत, भारताचं संयम, तयारी आणि धैर्य पुन्हा पुन्हा सिद्ध झालं आहे. दहशतवाद ही केवळ एक देशापुरती मर्यादित समस्या नाही, ती संपूर्ण जगासाठी एक संकट आहे. म्हणूनच American Manhunt ही सिरीज एकाच वेळी अमेरिकेची शौर्यगाथा सांगते आणि जगाला सतर्कतेचा इशाराही देते.
ओसामा बिन लादेन हे केवळ एक नाव नव्हतं तो द्वेष, कट्टरता आणि निर्दय हिंसेचं मूर्त रूप होतं. त्याचा पाडाव ही फक्त अमेरिकेची बदला घेण्याची कथा नव्हे, तर जगाला एका मोठ्या संकटापासून वाचवण्याचं उदाहरण आहे. ही सिरीज याच संदेशाला उजाळा देते की माणसाची जिद्द, बुद्धी, आणि देशभक्ती यांचं योग्य मिश्रण झालं, तर कोणतीही अंधारमय विचारसरणी संपवता येते.
मी या Documentary ला तीन स्टार देतो, कारण ती केवळ माहितीपूर्ण नाही, तर अंतर्मन हलवणारी आहे. ही सिरीज देशप्रेम, इतिहास आणि सत्याच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी ‘मस्ट वॉच’ आहे.
दहशतवादाचा सामना फक्त जश्यास तस उत्तर देऊन होणारी गोष्ट नाही. तो विचारांपासूनच सुरू होतो. आपल्याला हवे आहेत सजग नागरिक, जागृत मनं आणि एकीची एकीचं बळ. आपली एकजूट, समतेची भावना आणि मानवीय मूल्यं हेच खरं शस्त्र आहे दहशतवादाविरुद्ध लढण्याचं.
ट्रेंडिंग न्यूज





















