Ajay Devgn, Raid 2 Review: काही चित्रपटांचा सीक्वेल बनू नये, असं म्हणतात. त्यामुळेच कदाचित 'शोले'चा सीक्वेल आला नाही, 'हम आपके हैं कौन'चा सीक्वेल आला नाही, आणि असे बरेच सिनेमे आहेत, जे कायम लक्षात राहतात कारण त्यांचा लिगेसीशी छेडछाड करण्यात आली नाही. पण, बॉलिवूडकडे चांगल्या स्क्रिप्टची कमतरता आहे आणि त्याचमुळे ते जुन्या सिनेमांचे अनावश्यक सीक्वेल बनवून रिलीज करत आहेत. 'रेड 2' अशाच सिनेमांपैकी एक. या फिल्मची खरंच गरज नव्हती. या फिल्ममध्ये सतत अजय देवगणच्या चप्पलचे क्लोज शॉर्ट्स, खूपच वाईट गाणी, जग्गा जासूस बनण्याचा प्रयत्न करणारा हिरो आहे. फक्त एकच गोष्ट कमी आहे, ती म्हणजे रेड. रेड पडलीय ती सिनेप्रेमींवर, एक तर बेकार फिल्म, त्यावर 'रेड 2' च्या शोमुळे भूतनी आणि हिट 3 ला मिळालेले कमी शो. आता याला सिनेप्रेमींवरची रेड नाही म्हणायचं, तर काय म्हणायचं?
'रेड 2'ची कथा...
फिल्मच्या नावावरुनच कळतं की, आता रेड पणार आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं की, रितेश देशमुखवर रेड पडणार, रितेश एक मोठा नेता दाखवला आहे. ज्याची त्याच्या गावातील लोकं अक्षरशः पूजा करतात, त्याच्याच मालमत्तांवर रेड पडते. पण हा सीक्वल आहे, त्यामुळे रेड एवढी सोपी असेल असं नाही. सिनेमात हिरो रेड टाकण्याऐवजी ते सगळं करतो, जे आपले हिरो करत असतात. तो पोलिसांचंही काम करतो. जासूसही बनतो, पुरावेही गोळा करतो आणि शेवटी काय होणार? हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही आणि यामध्ये कोणताही स्पॉयलर देण्यात आलेला नाही. कारण ही फिल्म एक मोठा स्पॉयलर आहे.
'रेड 2' कसा आहे?
'रेड 2' अनावश्यक सिनेमा आहे, 'रेड' एक एक्सपीरियंस होता, त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी घडल्या. सस्पेन्स तर होताच, पण त्यासोबत थ्रीलही होता. पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर असं काहीतरी भारी पाहायला मिळालं होतं. पण, त्याउलट 'रेड 2'. यामध्ये जबरदस्तीनं छापा टाकण्याचा प्रयत्न केला जातो. चित्रपट सुरू होताच एक अजिबात गरज नसलेलं गाण येतं, आधीच अत्यंत अनावश्यक वाटणाऱ्या सिनेमात एक अनावश्यक गाणं पाहून खरंच राग येतो. या रागातून शांत होतो न होतो, तेवढ्यात आणखी एक गाणं येतं. तसं पाहिलं तर, 'रेड 2'च्या निर्मात्यांनी सिनेमा प्रमोटच गाण्यांनी केला आहे. हे पाहून तर फिल्मसोबतच बॉलिवूडची म्युझिक टेस्टही खराब झाल्याचंही जाणवलं. या फिल्ममध्ये रेड फार कमी वेळासाठी पडते, बाकीचा वेळ हिरो जग्गा जासूससारखा भासतो, चुलबुल पांडे वाटतो, सगळं काही वाटतं आपल्याला पण, इनकम टॅक्स ऑफिसर वाटत नाही. फिल्म खूपच कंटाळवाणा आणि संथ वाटतो, तो इतका अंदाज बांधत असतो की, पुढे काय होईल? याचा तुम्हीही सहज अंदाज लावू शकता, एकूणच हा चित्रपट खूप निराश करतो.
सिनेमातील अभिनयाबाबत...
अजय देवगणनं 'सिकंदर'मध्ये जशी सलमान खाननं अभिनय केलाय, अगदी तसाच अभिनय केला आहे, अजयच्या अभिनयात रस वाटतंच नाही, तो कंटाळवाणा वाटत होता, तो जबरदस्तीनं अभिनय करत असल्यासारखं वाटत होतं आणि त्याच्या यापूर्वीच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये असंच घडलं आहे, अजय हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेता आहे. अजय असा अभिनेता आहे, जो त्याच्या डोळ्यांनीच बराचसा अभिनय करतो, जो अनेकांना भावतो. पण माहीत नाही, हल्ली तो त्याच्या टॅलेंटवर काम करत असल्याचं पाहायलाच मिळत नाही. एकच एक्सप्रेशन त्याच्या इतर अनेक फिल्म्समध्ये पाहायला मिळतं. रितेश देशमुखचं काम चांगलं आहे. निगेटिव्ह रोलमध्ये तो उठून दिसतोय. फिल्ममध्ये खरी रेड तर अमित सियाल मारतो. अमित सियाल सर्वांपेक्षा वरचढ ठरला आहे. फिल्ममध्ये थोडाफार जीव उरला आहे, तो त्याच्यामुळेच. वाणी कपूर मधेमधे येत राहते. पण ती सिनेमात का आहे? हे काही कळत नाही. कदाचित हे दिग्दर्शकांनाच विचारावं लागेल. फिल्ममध्ये दिग्दर्शकांना सौरभ शुक्ला सारख्या दिग्गज कलाकाराला वापरुन घेता आलं नाही, हे स्पष्ट जाणवतं. रजत कपूर ठीक ठाक आहे.
लेखन आणि दिग्दर्शन...
'रेड 2' फिल्मचं लेखन पाच जणांनी मिळून केलंय. रितेश शाह, राज कुमार गुप्ता, जयदीप यादव, करन व्यास आणि अक्षत तिवारी. फिल्म पाहून लेखनात अजिबात सुसंगती नसल्याचं प्रकर्षानं जाणवतं. सगळ्यांनी आपलं काम एकमेकांवर टाकल्याचं जाणवतं. जर आपण काय लिहिलंय हे या पाचही जणांनी वाचलं असतं, तर फिल्म पाहणाऱ्यांच्या खिशावर रेड पडलीच नसती. राज कुमार गुप्ता यांनी जर 'रेड 2' बनवलाच नसता, तर त्यांना 'रेड' सारख्या शानदार फिल्मसाठी सर्वांनी आवर्जुन लक्षात ठेवलं असतं. पण, त्यांनी 'रेड 2' बनवून स्वतःच्याच सर्वोत्तम फिल्मची लिगेसी संपुष्टात आणली आहे. त्यांचं दिग्दर्शन अजिबात दमदार नाही, सिनेमात ट्वीस्ट अँड टर्न्स नाहीत. ना सस्पेन्स, ना मसाला, ना थ्रील, त्यामुळे 'रेड 2' अजिबात खिळवून ठेवत नाही.
सिनेमाचं म्युझिक...
'रेड 2'मध्ये अमित त्रिवेदीनं म्युझिक दिलंय, यावर विश्वास बसत नाही. हल्ली फिल्म्सच्या प्रमोशनसाठी गाण्यांचा वापर केला जातो. पण, या फिल्ममध्ये अत्यंत वाईट गाणी आहेत. ही खूपच हैराण करणारी बाब आहे. हे आतापर्यंत रिलीज झालेल्या सर्वात वाईट म्युझिकपैकी एक आहे.
एकंदरीत हा सिनेमा तुमच्या खिशावर रेड टाकेल.
रेटिंग : 2 स्टार्स