Baal Bhaarti Movie Review : 'इंग्रजी' म्हणलं की आजही अनेकांच्या अंगावर शहारे येतात. उभ्या आयुष्यात इंग्रजी भाषेशी छत्तीसचा आकडा असल्यानं मोठी स्वप्न साकारता येत नाहीत,
असा विचार अनेक पालक मंडळी करतात. आपल्या मुलांना चांगल्या इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकवण्यासाठीचा अट्टाहास करताना दिसतात. याचं कारण असंही आहे की, मुलांना सतत आजूबाजूला इंग्रजी बोलणाऱ्यांचं वातावरण असलं की अगदी सहजपणे इंग्लिश बोलता येईल अशी समजूत असतेच, शिवाय मराठी माध्यमिक शाळेत इंग्रजी शिकवलं जातंच. मात्र, इतर माध्यमातील मुलांच्या तुलनेने आपली मुलं मागे पडायला नको आणि मुलांनी मोठं झाल्यावर मराठी शाळेत शिक्षण झालं असल्यानं आमचं इंग्रजी सुधारलं नाही किंवा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही. असा ठपका भविष्यात पालकांवर मुलांनी ठेवायला नको म्हणून असलेली ओरड सर्रास आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रश्नांकडे 'बाल भारती' या सिनेमा मधून लेखक-दिग्दर्शक नितीन नंदन यांनी लक्ष वेधलं आहे.


‘बाल भारती’मध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री नंदिता पाटकर, उषा नाईक, बालकलाकार आर्यन मेंघजी सोबतच रवींद्र मंकणी आणि  रॉकिंग अभिजित खांडकेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर, अगदी सरळ साधी कोल्हापूरच्या मराठी कुटुंबाची गोष्ट आहे. आई नंदिता, बाबा सिद्धार्थ तर चिन्या, चिन्मय म्हणजे आर्यन आणि त्याची आज्जी, सरस्वती विद्यालयचे त्याचे शाळेचे मित्र... यांच्या अवती भोवती सिनेमाचं हलकं फुलकं कथानक गुंफलेलं आहे. चिन्याच्या वडिलांचं म्हणजे सिद्धार्थचं एक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रिपेअरिंगचं चौकात दुकान असतं. टॅलेंटेड असणाऱ्या बाबा सारखा चिन्या पुस्तकी किडा नसून, तो त्याच्या घरातल्या वस्तूंसोबत
काही ना काही शोध, जुगाड, वैज्ञानिक प्रयोग करण्यात विशेषतः विज्ञानाची आवड असलेला मुलगा आहे. खरंतर सिनेमाचं चित्रीकरण 3 वर्षांपूर्वी झालेलं असल्यानं चिन्या म्हणजे आर्यन तेव्हा बराच लहान होता आणि आता ओळखू देखील येणार नाही एवढा उंच झालाय.. 


चिन्याचे बाबा मोठ्या संधीच्या शोधात असतात. मात्र, मुलाखती देताना इंग्रजी बोलता येत नसल्याने बाबांची गोची होते, आणि झालेला अपमान जीवाला लागतो. संधी हुकल्यामुळे स्वप्नांचा चुराडा होतो ते फक्त इंग्रजी भाषा बोलता येत नसल्याने आणि मग काय सिनेमा फिरतो... इंग्रजी काळाची गरज आहे, असं समजून आपल्या चिन्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी, त्याला इंग्लिश येण्यासाठी संपूर्ण कुटुंब वाटेल ते करायचे मार्ग शोधायला लागतात... मग आपापसात इंग्लिशमध्येच बोलायचं असंही ते ठरवतात. चिन्याच्या मराठी शाळेचे, सरस्वती विद्यालयचे मुख्याध्यापक यांच्या भूमिकेत रवींद्र मंकणी  खरोखरच मुख्याध्यापक म्हणून भावले. मराठी शाळेत विद्यार्थी संख्या का कमी होतेय, आणि शाळा का बंद पडत आहेत, तसेच याबद्दल एक समाज म्हणून आपल्याला काय करता येईल, जेणेकरून हा वारसा टिकेल यासाठीची धडपड करणाऱ्या मुख्याध्यापकाची भूमिका रवींद्र मंकणी यांनी चोख बजावली आहे. इथं आपल्याला आपल्या शाळेतील असेच शिक्षक हेडमास्तर नक्की आठवतील. शाळेत चैतन्य घेऊन येणारा रॉकी म्हणजे अभिजित खांडकेकर देखील कथानकाला गती देतो. 


सिनेमाचा पहिला हाफ सिद्धार्थ तर, दुसरा हाफ अभिजितने गाजवला म्हणायला हरकत नाही... सोबतच चिन्याची आई नंदिता यांची भूमिका आणि अभिनयसुद्धा खूप गोड आहे...


सिनेमात असलेली गाणी, सिनेमाची भाषा, सिनेमाचा रंग, सिनेमाची गोष्ट ही एकदम परफेक्ट बसली आहे..


चिन्याचा मराठी ते इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन बाल शास्त्रज्ञ
होईपर्यंतचा प्रवास म्हणजे 'बाल भारती' भाषेची बंधनं ओलांडणारा सिनेमा...


हा सिनेमा प्रत्येक पालक, विद्यार्थी, सर्व शिक्षक मग ते मराठी असो किंवा इंग्रजी माध्यमाचे असो, प्रत्येकांच्या कळकळीचा विषय म्हणजे चांगलं शिक्षण आणि सोबत मराठी संस्कृती, 
गमतीशीर मनाला भिडणारी गोष्ट ही पालकांच्या प्रश्नांना आणि मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक ट्रिगर ठरणारी आहे!


पालकांनी आवर्जून पहावा असा सिनेमा या सिनेमाला मी देतोय 3.5 स्टार...