World Breastfeeding Week: दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो, ज्याचा उद्देश मातांना स्तनपानाच्या महत्त्वाविषयी शिक्षित करणे हा आहे. बाळाच्या निरोगी वाढीसाठी स्तनपानातून मिळणारे दूध हे सर्वोतम पेय आहे. हे दूध म्हणजे जीवनसत्त्व, प्रथिने आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचा योग्य स्रोत आहे. बऱ्याचदा सिझेरियन (C-Section) प्रसूतीनंतर अनेक मातांना स्तनपान सुरू करण्यास अडचणी येतात. शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या वेदना, हालचालींवरील येणाऱ्या मर्यादा, थकवा आणि दूध कमी येत असल्याची भीती यामुळे अनेक नवमातांना नैराश्याचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते, योग्य मार्गदर्शन, संयम आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य आहे. पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुमती तडस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या तासात स्तनपान सुरू केल्यास...
डॉ. तडस म्हणाल्या की, स्तनपान हे केवळ बाळाला आहार देण्याचे माध्यम नसून आई आणि बाळ यांच्यातील भावनिक नाते दृढ करणारी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. जन्मानंतरच्या पहिल्या तासात स्तनपान सुरू केल्यास बाळाला कोलोस्ट्रम (पहिले दूध) मिळते. हे दूध अँटीबॉडीज, प्रथिने आणि रोगप्रतिकारक घटकांनी समृद्ध असते, जे नवजात बाळाचे संसर्गांपासून संरक्षण करते. सिझेरियननंतर काही मातांना बाळाला योग्य प्रकारे धरून स्तनपान देणे कठीण वाटू शकते. अशा वेळी साइड-लायिंग पोझिशन किंवा फुटबॉल होल्डसारख्या पद्धती फायदेशीर ठरू शकतात.
अनेक महिलांना स्तनपानाबाबत अनावश्यक भीती वाटते
डॉक्टर सांगतात, सिझेरियन प्रसूतीनंतर अनेक महिलांना स्तनपानाबाबत अनावश्यक भीती वाटते. शस्त्रक्रियेमुळे दूध निर्मिती प्रक्रियेत अडथळा येत नाही. मात्र वेदना, तणाव आणि थकवा यांचा परिणाम स्तनपानावर होऊ शकतो. त्यामुळे प्रसूतीनंतर शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करणे, पुरेशी विश्रांती घेणे, संतुलित आहाराचे सेवन करणे आणि आवश्यक असल्यास स्तनपान विशेष तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. कुटुंबीयांनीही आईला भावनिक आधार देणे गरजेचे आहे. जी मुलं 6 महिने आईचे दूध घेतात त्यांना मधुमेह आणि लठ्ठपणाची शक्यता कमी असते आणि त्यांची बौद्धिक पातळी देखील चांगली असते.
नवमातांच्या मनात सर्वाधिक पडणारा प्रश्न म्हणजे, माझ्या बाळाला पुरेसे दूध मिळत आहे का? त्याचे पोट भरतेय का? ही 7 लक्षणं दिसल्यास तुमच्या बाळाला पुरेसे दुध मिळतेय असं समजा
* बाळ दिवसातून किमान 6 ते 8 वेळा लघवी करत आहे.* बाळाचे वजन नियमितपणे वाढत आहे.* स्तनपानानंतर बाळ शांत व समाधानी दिसते.* स्तनपान करताना गिळण्याचा आवाज ऐकू येतो.* बाळाची त्वचा आणि हालचाली सक्रिय दिसतात.* आईला स्तनपानानंतर स्तन हलके झाल्यासारखे वाटते.
पुण्यातील औंध येथील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चिल्ड्रेन स्पनपान सल्लागार डॉ. अमृता देसाई म्हणाल्या की, पहिल्यांदाच आई झालेल्या महिलांमध्ये दूध पुरेसे आहे की नाही याबाबत शंका असते. त्यामुळे अनेकदा घाईघाईने फॉर्म्युला दूध सुरू केले जाते. मात्र बाळाचे वजन, लघवीचे प्रमाण आणि त्याची एकूण वाढ यानुसार बाळाला पुरेसे दुध मिळतेय का हे समजते. पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध दिल्यास बाळाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि अतिसार, श्वसनाचे संसर्ग तसेच अनेक आजारांचा धोका कमी होतो. स्तनपानामुळे गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यास मदत होते, प्रसूतीनंतर होणारा रक्तस्त्राव कमी होऊ शकतो आणि भविष्यात स्तनाचा व गर्भाशयाच्या कर्करोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो. या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने तज्ज्ञांनी नवमातांना स्तनपानाबाबत योग्य माहिती घेण्याचे आणि कोणतीही स्तनपानासंबंधी कोणती समस्या आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
