Women Health: ओव्हेरियन कॅन्सर म्हणजेच अंडाशयाचा कर्करोग हा महिलांना प्रभावित करणार्या सर्वात घातक कर्करोगांपैकी एक आहे. या कर्करोगामुळे स्त्रियांमध्ये होणारे जगभरातील मृत्यू यांचा विचार केल्यास अंडाशयाचा कर्करोगाचे यामध्ये चौथं स्थान आहे. दिवसेंदिवस अंडाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालल्याचे निदर्शनास येत आहे. हा कर्करोग तेव्हा होतो, जेव्हा अंडाशयातील कर्करोगाच्या पेशी वाढू लागतात आणि त्या हळूहळू पसरतात. या प्रक्रियेमुळे कर्करोगाची गाठ तयार होते. तळेगाव येथील रेडिएशन आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर, येथील डॉक्टर ज्योती मेहता यांनी महत्त्वाची माहिती दिलीय..
अनियमित मासिक पाळीसारख्या समस्येत वाढ..
हल्ली बऱ्याच महिला त्यांची मासिक पाळी वेळेवर येत नसल्याची तक्रार करतात. बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयात मासिक पाळी येणे, अनियमित मासिक पाळी अशा समस्यांमध्येही वाढ झाली आहे. भविष्यात हे लक्षण गर्भाशयाच्या कर्करोगाचे देखील असू शकते. याबद्दल अनेक महिलांना माहिती नसते. जर तुम्हाला मासिक पाळी न येण्याची समस्या खूप दिवसापासून असेल. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये जास्त रक्तस्राव, कंबर आणि योनी किंवा आसपास भागांमध्ये वेदना जाणवत असतील तर अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्या. आवश्यक ती तपासणी करा.
मासिक पाळीदरम्यान वेदना, पोट फुगणे, असामान्य रक्तस्रावासारख्या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष - तज्ज्ञांचा सल्ला
डॉ ज्योती मेहता, (रेडिएशन आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर, तळेगाव) सांगतात की, अंडाशयाचा कर्करोग 50 पेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये सर्वात सामान्य आहे, परंतु तो कोणत्याही वयात होऊ शकतो. रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना याचा अधिक धोका असतो. जर एखाद्या महिलेला काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत सूज येणे, ओटीपोटात अस्वस्थता किंवा इतर असामान्य लक्षणे जाणवत असतील तर पुढील मूल्यांकनासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. प्राथमिक टप्प्यात निदान झाल्यास योग्य उपचारांनी आयुर्मान वाढू शकतं. संप्रेरकयुक्त गर्भनिरोधक गोळ्या, गर्भधारणा तसेच स्तनपान केल्यामुळे अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. अंडाशयाचा कर्करोगाच्या उपचार पद्धतींमध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिओथेरपीचा समावेश असतो. समूळ रोग नष्ट करण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज पडते.
हेही वाचा:
वयाची पन्नाशी ओलांडल्यावर विशेष काळजी घ्या; अंडाशयाच्या कर्करोगाचं वेळीच निदान वाचवू शकतो महिलांचा जीव, लक्षणं, उपाय काय?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)