Women Health: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये करिअर, आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देताना मातृत्वाचा निर्णय उशिरा घेतला जातो. मात्र याच काळात प्रजनन आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे योग्य वेळी तपासण्या, सल्ला आणि जागरूकता अत्यंत गरजेची ठरते. उशिरा गर्भधारणा करण्याचा विचार असल्यास आधीच प्रजनन आरोग्य तपासून घेणं महत्त्वाचं आहे.
अलीकडच्या काळात महिलांमध्ये प्रजनन आरोग्याबाबत जागरूकता वाढताना दिसत आहे. विशेषतः उशिरा गर्भधारणा करण्याचा विचार करणाऱ्या महिलांसाठी योग्य वेळी तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर एएमएच (Anti-Müllerian Hormone) चाचणी ही महिलांच्या प्रजननक्षमतेचे आकलन करून देणारी महत्त्वाची चाचणी मानली जाते.
ही चाचणी करणे आवश्यक
तज्ज्ञांच्या मते, एएमएच ही एक साधी रक्त चाचणी असून ती महिलांच्या अंडाशयातील ‘ओव्हेरियन रिझर्व्ह’ म्हणजेच उपलब्ध अंड्यांची संख्या दर्शवते. हे हार्मोन लहान फॉलिकल्समधून तयार होत असून त्याचे प्रमाण मोजून भविष्यातील प्रजननक्षमतेचा अंदाज घेता येतो. विशेष म्हणजे, ही चाचणी मासिक पाळीच्या कोणत्याही दिवशी करता येते.
मुंबईमधील विरारच्या नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी रुग्णालयातील वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना पलगामकरयांनी सांगितले, एएमएच पातळी कमी असल्यास अंड्यांची संख्या वयानुसार अपेक्षेपेक्षा कमी असण्याची शक्यता दर्शवते. मात्र याचा अर्थ गर्भधारणा अशक्य आहे असा होत नाही; फक्त प्रजननासाठी उपलब्ध कालावधी कमी असू शकतो, असे तज्ज्ञ स्पष्ट करतात. उलट एएमएच जास्त असल्यास अंड्यांची संख्या चांगली असल्याचे संकेत मिळतात.
कोणासाठी हे चाचणी महत्वाची?
ही चाचणी विशेषतः गर्भधारणेस प्रयत्न करणाऱ्या, गर्भधारणा न होण्याची समस्या असलेल्या, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), अनियमित मासिक पाळी किंवा अकाली रजोनिवृत्तीचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांसाठी उपयुक्त ठरते. एएमएचसोबतच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH), ल्युटिनायझिंग हार्मोन (LH) आणि अँट्रल फॉलिकल काउंट यांसारख्या इतर तपासण्या करण्याचा सल्ला देखील तुमचे डॉक्टर देऊ शकतात.
या चाचणीतून काय कळते?
एएमएच चाचणीमुळे महिलांना त्यांच्या प्रजननक्षमतेबाबत स्पष्ट चित्र कळते. योग्य वेळी सल्ला घेतल्यास अनेक महिलांना निरोगी गर्भधारणा साध्य करता येते.चांगल्या प्रजनन आरोग्यासाठी संतुलित आहार, धूम्रपान व मद्यपान टाळणे, नियमित व्यायाम आणि योग्य वजन राखणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे. महिलांनी वेळेत एएमएच चाचणी करून योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे.
