Health: आजकाल अनेक जोडप्यांना गर्भधारणेसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अशात अनेक जण मूल होण्यासाठी IVF प्रकियेचा आधार घेतात. मात्र अनेकांच्या हाती निराशा लागते. अशात नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी, पुणे येथील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एकुण आयव्हीएफ उपचारांपैकी जवळपास 10 ते 15 टक्के प्रकरणांना वारंवार अपयशाला सामोरे जावे लागते. हे प्रमाण मुख्यतः 35 वर्षांवरील महिलांमध्ये अधिक आहे. तीन किंवा अधिक वेळा उपचार अपयशी झाल्यास त्याला रिपीटेड आयव्हीएफ फेल्युअर (Repeated IVF Failure) असे म्हणतात. अशा अपयशामुळे रुग्ण भावनिकदृष्ट्या खचतात, पण तज्ज्ञांच्या मते हल्ली वैद्यकीय प्रगतीमुळे या कारणांमुळे खचुन न जाता धैर्याने सामना करणे गरजेचे आहे .

धैर्याने सामना करणे गरजेचे..

फर्टिलिटी तज्ज्ञांच्या मते, स्त्रीबीज किंवा शुक्राणूंची गुणवत्ता, गर्भाशयातील पॉलिप्स-फायब्रॉइड्स, जनुकीय दोष, जीवनशैली किंवा गर्भाशयाच्या अस्तरातील समस्या ही यामागची प्रमुख कारणं आहेत . प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करुन योग्य उपचार योजना आखणे गरजेचे आहे. डॉ. निशा पानसरे(फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी) सांगतात की, गर्भाशयासंबंधी विकारामुळे गर्भारोपणात अडचणी येऊ शकतात. काही वेळा भ्रूण संरचनात्मकदृष्ट्या सामान्य दिसत असला तरी जनुकीय दोषामुळे त्याचे यशस्वीपणे रोपण होत नाही. अशा वेळी Preimplantation Genetic Testing (PGT) म्हणजेच गर्भरोपणपूर्वी केली जाणारी अनुवांशिक चाचणी महत्त्वाची ठरते.

गर्भरोपणाची शक्यता कशी वाढते?

डॉ. माधुकरी जे शिंदे(फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पिंपरी-चिंचवड) सांगतात की, एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे (Endometrial Receptivity Array -ERA) चाचणीद्वारे गर्भारोपणासाठी योग्य वेळ ठरवता येतो. तर लेज़र असिस्टेड हॅचिंग (Laser Assisted Hatching) हे एक प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये लेझरचा वापर करून भ्रूणाच्या बाहेरील थरात एक लहान छिद्र केले जाते, ज्यामुळे ते गर्भाशयात रोपण होण्यास मदत होते. एम्ब्रियो ग्लु (Embryo Glue) हे एक विशेष माध्यम आहे, जे भ्रूण रोपण प्रक्रियेस मदत करण्यासाठी वापरले जाते. यांसारख्या तंत्रामुळे गर्भरोपणाचा यशदर वाढतो.

नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुणे येथे अत्याधुनिक प्रयोगशाळा तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध असून, पालकत्वास इच्छुक जोडप्यांना त्यांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन व उपचार दिले जातात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)