Winter Travel: मनाली या ठिकाणाचं नाव घेताच तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे मोठमोठे बर्फाचे डोंगर.. नितळ, स्वच्छ नद्या, डोळ्याची पारणे फेडणारी दृश्य.. जिथे पाहाल तिथे निसर्ग.. अशा या वातावरणात फिरायला कोणाला आवडणार नाही? भारतात हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये मनाली पहिल्या क्रमांकावर आहे. कारण मनाली हे नैसर्गिक सौंदर्य, बाजारपेठा, वातावरण आणि इतर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही मुंबईवरून मनालीला जाण्यासाठी ट्रीप प्लॅन करत असाल तर काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. यामुळे तुमची ट्रीप अगदी कमी खर्चात होईलच, पण तुम्ही ती एन्जॉयही करू शकाल..
मनालीला जाण्यासाठी कोणता महिना सर्वोत्तम असतो?
मनालीसाठी हिवाळा ऋतू आणखी खास असतो. त्यामुळेच लोक हिवाळ्यात येथे भेट देतात. याचे सर्वात मोठे कारण हिमवर्षाव असू शकते. मनालीमध्ये डिसेंबर ते जानेवारी दरम्यान भरपूर बर्फ पडतो. अशा स्थितीत रस्ते, घरे आणि डोंगर पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकून जातात. ही सुंदर दृश्ये पाहण्यासाठी अनेकजण मुंबईतून सहलीचे नियोजन करतात. मनाली हे भारतातील एक मोठे पर्यटन स्थळ आहे. तुम्हालाही मुंबईतून कमी बजेटमध्ये सहलीची योजना करायची असेल, तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. अन्यथा ही ट्रीप महागात पडू शकते.
मुंबईहून मनालीला जाणाऱ्यांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्यात
-नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरच्या सुरुवातीला मनालीमध्ये तुम्हाला जानेवारीमध्ये इतकी गर्दी दिसणार नाही. जानेवारी महिन्यात मनालीमध्ये बर्फ जास्त असतो, त्यामुळे लोक त्या वेळी मनालीला जाणे पसंत करतात. मनालीमध्ये भेट देण्यासाठी बरीच चांगली ठिकाणे आहेत.
-कमी बजेटमध्ये मनालीची सहल पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला प्रथम मुंबईहून मनालीला जाण्यासाठी मार्ग निवडावा लागेल. तुम्ही बस किंवा कारने प्रवास करण्याऐवजी ट्रेनने प्रवास करू शकता.
-मनालीला जाण्यासाठी तुम्हाला थेट ट्रेन मिळणार नाही. पण तुम्ही हिमाचल प्रदेशातील जोगिंदर नगर रेल्वे स्टेशनसाठी तिकीट बुक करू शकता. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर येथून मनालीला जाण्यासाठी बस पकडावी.
-लक्षात ठेवा की, मनालीला फिरण्यासाठी तुम्ही कॅब बुक करण्याऐवजी बसने प्रवास करावा. कारण ते तुमच्यासाठी स्वस्त असेल.
-मनालीमध्ये अनेकांना जीप राईड किंवा मोटार बाईक राईड करायला आवडते. परंतु एका व्यक्तीसाठी त्याची किंमत 1500 ते 2000 रुपये आहे. हे तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी घेऊन जाते, त्यामुळे पायी प्रवास करणे चांगले. जर तुम्ही पायी प्रवास करत असाल तर तुम्हाला मनालीचे सौंदर्य सहज थांबून पाहता येईल.
-मनालीमध्ये, उंचावर जाण्यासाठी खेचरे देखील भाड्याने उपलब्ध आहेत, ज्यासाठी प्रति व्यक्ती 800 ते 1000 रुपये आकारले जातात. तुम्ही हे देखील वापरू शकता.
-तुम्ही मनालीमधील हॉटेल्स अगोदरच ऑनलाइन बुक करा, कारण मनालीला पोहोचल्यानंतर हॉटेल बुक करणे महागात पडू शकते.
-जेवणासाठी छोटा ढाबा निवडावा, कारण तो तुमच्यासाठी स्वस्त असेल. याशिवाय मनालीमध्ये मॅगीवर जास्त पैसे खर्च करू नका. कारण मॅगीच्या एका प्लेटसाठी तुम्हाला 100 ते 150 रुपये मोजावे लागतील.
-मनालीमध्ये खरेदी करणे टाळा, कारण इथे प्रत्येक वस्तूचे दर दुप्पट आहेत. आवश्यक कपडे आणि सामान सोबत घेण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा>>>
Maharashtra Hidden Places: 'अरेच्चा..! महाराष्ट्रात लपलेले 'हे' सुंदर हिल स्टेशन माहितच नव्हते!' अनेकांच्या नजरेपासून दूर, एकदा बघाल तर प्रेमातच पडाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )