Winter Solstice: पृथ्वीवर 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस (Longest Day) असतो आणि या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होतं. उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन स्थिती असतात. सूर्याचं उत्तरायण (Summer Solstice) आणि दक्षिणायन (Winter Solstice) म्हणजेच सूर्याचा उत्तर दिशेकडील आणि दक्षिण दिशेकडील सुरू झालेला प्रवास.


पृथ्वी 365 दिवसांत सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. सहा महिने पृथ्वी उत्तर ध्रुवाकडे कललेली असते, तर सहा महिने पृथ्वी दक्षिण ध्रुवाकडे कललेली असते. दर सहा महिन्यांच्या अंतराने दोन दिवशी सूर्य आणि पृथ्वीचे अंतर सारखेच असते, त्यामुळे वर्षातल्या दोन दिवशी दिवस आणि रात्रीचा वेळ समान असतो.


दक्षिणायन म्हणजे काय?


सूर्याची उगवण्याची स्थिती दिवसेंदिवस दक्षिणेकडे झुकण्याच्या क्रियेला दक्षिणायन (Winter Solstice) असं म्हणतात. दक्षिणायनात पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात सूर्याचा प्रवेश दर्शवतो, त्यामुळे या क्रियेला दक्षिणायन असं संबोधलं जातं. जून ते डिसेंबर महिन्यात सूर्याचा दक्षिणेकडचा प्रवास म्हणजे दक्षिणायन. 21 जूनला दक्षिणायन सुरु होतं आणि 22 डिसेंबरला दक्षिणायन संपतं. या सहा महिन्यात पावसाळा, शरद, हेमंत आणि हिवाळ्याची सुरुवात, असे ऋतू पाहायला मिळतात.


दक्षिणायन सुरु झाल्यानंतर दिवस छोटा होऊ लागतो तर रात्र मोठी होऊ लागते. ज्या दिवशी दक्षिणायन संपतं, म्हणजेच 22 डिसेंबरला सर्वात छोटा दिवस असतो आणि सर्वात मोठी रात्र असते. या दिवशी सूर्य विषुववृत्तापासून जास्तीत जास्त दक्षिणेकडे कललेला दिसतो आणि दक्षिण ध्रुव सूर्याच्या जवळ कललेला असतो. तर, 21 सप्टेंबरला दिवस आणि रात्र सारखे असतात. 


उत्तरायण म्हणजे काय?


सूर्याची उगवण्याची स्थिती दिवसेंदिवस उत्तरेकडे झुकण्याच्या क्रियेला उत्तरायण (Summer Solstice) असं म्हणतात. उत्तरायणात पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सूर्याचा प्रवेश दर्शवतो, त्यामुळे या क्रियेला उत्तरायण असं संबोधलं जातं. डिसेंबर ते जून महिन्यात सूर्याचा उत्तरेकडचा प्रवास म्हणजे उत्तरायण. 22 डिसेंबरनंतर उत्तरायण सुरु होतं आणि 21 जूनला उत्तरायण संपतं. हिवाळा, वसंत, उन्हाळा हे ऋतू या सहा महिन्यात आपल्याला पाहायला मिळतात.


उत्तरायण सुरु झाल्यानंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी होऊ लागते. या दिवसांत हवामान उष्ण होत लागते. ज्या दिवशी उत्तरायण संपतं, म्हणजेच 21 जूनला सर्वात मोठा दिवस असतो आणि सर्वात छोटी रात्र असते. या दिवशी सूर्य विषुववत्तापासून जास्तीत जास्त उत्तरेकडे कललेला दिसतो आणि उत्तर ध्रुव सूर्याच्या जवळ कललेला असतो. तर, 21 मार्चला दिवस आणि रात्र सारखे असतात. 


हेही वाचा:


Longest Day of 2023: आज पृथ्वीवर दिवसाचंच साम्राज्य; रात्र असणार छोटी