Metabolic Syndrome and Thyroid: मानेच्या समोरच्या भागात असलेली लहान, फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त महत्त्वाचे काम करते. थायरॉईड चयापचय क्रिया नियंत्रित करण्यास मदत करते, तसेच तुमचे वजन, ऊर्जेची पातळी आणि हार्ट रेटवर (हृदयाचे ठोके) देखील प्रभाव पाडते. तरीदेखील, मेटाबॉलिक सिंड्रोम सारख्या आजारांमध्ये थायरॉईडच्‍या भूमिकेकडे दुर्लक्ष केले जाते. थायरॉईडची काळजी घेणे हे एकूण आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याच्‍या दिशेने पहिले पाऊल असले पाहिजे. मेटाबोलिक सिंड्रोम असलेल्‍या ४ पैकी एका व्‍यक्‍तीला हायपोथायरॉईडीझम असू शकतो. वर्ल्‍ड थायरॉईड अवेअरनेस मंथ निमित्त हा संबंध आणि चयापचय क्रिया उत्तम ठेवण्यासाठी थायरॉईडचे व्यवस्थापन कसे करावे, हे जाणून घेऊया.

Continues below advertisement

मेटाबोलिक सिंड्रोम म्‍हणजे काय? 

जगभरातील चारपैकी एक व्‍यक्‍ती मेटाबोलिक सिंड्रोमने ग्रस्‍त आहे. मेटाबोलिक सिंड्रोम म्‍हणजे आरोग्‍यसंबंधित समस्‍यांचा समूह, ज्‍या अनेकदा एकत्र उद्भवतात जसे उच्‍च रक्‍तदाब, रक्‍तामध्‍ये साखरेचे उच्‍च प्रमाण आणि पोटाचा वाढलेला घेर. या समस्‍या एकत्र उद्भवल्‍यास गंभीर आजार होण्‍याचा धोका वाढतो.जसे हृदयसंबंधित आजार, स्‍ट्रोक आणि टाइप २ मधुमेह. व्‍यक्‍तीला रक्‍तातील साखरेचे उच्‍च प्रमाण, कमी 'गुड' एचडीएल कोलेस्‍ट्रॉल, उच्‍च ट्रायग्लिसराइड्स, कमरेचा वाढलेला घेर आणि उच्‍च रक्‍तदाब असे तीन किंवा अधिक जोखीम घटक असताना मेटाबोलिक सिंड्रोमचे निदान होते. या घटकांमुळे अखेर हृदयसंबंधित आजार, मधुमेह, स्‍ट्रोक आणि इतर आरोग्‍यसंबंधित समस्‍या यांचा धोका वाढतो. 

हायपोथायरॉईडीझम आणि मेटाबोलिक सिंड्रोम यांचा अनेकदा परस्‍परसंबंध असतो, ज्‍यांचा रक्‍तातील साखरेचे प्रमाण, कोलेस्‍ट्रॉल, वजन व रक्‍तदाब यांचे व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या शरीराच्‍या क्षमतेवर प्रभाव पडू शकतो. हा परस्‍परसंबंध भारतात अधिक दिसून येतो, जेथे थायरॉईडसंबंधित समस्‍या सामान्‍य आहेत. १० पैकी एका व्‍यक्‍तीला हायपोथायरॉईडीझम आहे. आजची धावपळीची जीवनशैली, अयोग्‍य पोषण, व्‍यायामाचा अभाव, अधिक तणाव, पुरेशी झोप न मिळणे आणि पर्यावरणीय घटक यामुळे जोखीमयुक्‍त स्थिती निर्माण होते, परिणामत: हायपोथायरॉईडीझम आणि मेटाबोलिक सिंड्रोम या दोन्‍ही समस्‍या उद्भवतात.

Continues below advertisement

हायपोथायरॉइडिझमवर बारकाईने लक्ष ठेवा 

मुंबईतील केडीए हॉस्पिटलमधील कन्‍सल्‍टण्‍ट एण्‍डोक्रिनोलॉजिस्‍ट डॉ. अर्चना जुनेजा म्‍हणाल्‍या, “थायरॉईड ग्रंथी शरीराचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी पुरेसे हार्मोन्स तयार करू शकत नाही, तेव्हा हायपोथायरॉईडीझम म्‍हणजेच अकार्यक्षम थायरॉईड स्थिती उद्भवते. या संथ गतीने होणाऱ्या प्रक्रियेचा शरीराच्‍या चयापचय क्रियेवर परिणाम होतो, ज्‍यामुळे वजन, रक्‍तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. थायरॉईडचे कार्य मंदावल्यामुळे रक्‍तामध्‍ये एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढू शकते, इन्सुलिनला प्रतिरोध होऊ शकतो आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.''  

अॅबॉट इंडियाच्‍या मेडिकल अफेअर्सच्‍या प्रमुख डॉ. किन्‍नरा पुट्रेवू म्‍हणाल्‍या, “हायपोथायरॉईडिझमचे अनेकदा सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये निदान होत नाही. हायपोथयरॉईडिझम आणि मेटाबॉलिक सिंड्रोमची लक्षणे एकमेकांशी मिळतीजुळती असू शकतात, त्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा संबंधित जोखीम घटक असलेल्या प्रत्येकाने नियमितपणे थायरॉईडची तपासणी करणे आवश्यक आहे. तुम्‍हाला या समस्‍यांचा त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी जाणे अत्यंत आवश्‍यक आहे.'' 

थायरॉईड ग्रंथी नियंत्रणात ठेवण्‍यासाठी काही उपाय पुढे देण्‍यात आले आहेत. 

संतुलित आहार: आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याच्‍या दिशेने पहिले पाऊल थायरॉईड आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी योग्‍य प्रमाणात पौष्टिक घटक असलेल्‍या आहाराचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. या पौष्टिक घटकांच्‍या खूप कमी किंवा खूप जास्‍त प्रमाणाचा थायरॉईडच्‍या कार्यावर परिणाम होऊ शकतो. संतुलित आहाराचे सेवन करा आणि अधिक प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, सॅच्‍युरेटेड फॅट्स, सोया-आधारित उत्‍पादने आणि गोड पदार्थांचे सेवन कमी करा.

उपचारामध्‍ये सातत्‍यता राखा 

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार थायरॉईडच्या औषधांचे वेळापत्रक काटेकोरपणे पालन करा, ज्‍यामुळे उपचार योग्‍य दिशेने सुरू राहिल आणि शरीरातील हार्मोन्‍सचे संतुलन कायम राहिल. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषध बंद करू नका किंवा औषधाच्‍या डोसमध्ये कोणताही बदल करू नका.

व्‍यायाम करा 

दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये जलदपणे चालणे, सायकल चालवणे किंवा पोहणे यासारख्‍या सौम्‍य प्रमाणात व्‍यायामामुळे चयापचय क्रिया सक्रिय राहण्‍यास मदत होते. नियमितपणे शारीरिक व्‍यायाम केल्‍याने मेटाबोलिक आरोग्‍य उत्तम राहते आणि हायपोथायरॉईडिझमच्‍या लक्षणांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास, तसेच वजन वाढवण्‍यावर नियंत्रण ठेवण्‍यास मदत होते.

प्रसन्‍न राहा, आरोग्‍यदायी राहा

तणावाचा तुमच्‍या मूडवर, तसेच थायरॉईडवर देखील परिणाम होतो. तणाव वाढतो तेव्‍हा कॉर्टिसोल पातळ्यांमध्‍ये वाढ होते, ज्‍याचा थायरॉईडच्‍या कार्यावर परिणाम होऊ शकतो. आराम करणे आणि स्‍वत:ची काळजी घेणे याद्वारे तणावाचे व्‍यवस्‍थापन केल्‍यास हार्मोनल संतुलन राखण्‍यास मदत होते आणि थायरॉईड आरोग्‍य उत्तम राहते.   हायपोथायरॉईडीझम आणि मेटाबॉलिक सिंड्रोम अनेकदा एकाच वेळी उद्भवतात आणि ते एकमेकांचे परिणाम अधिक वाढवतात. या समस्‍यांबद्दल अधिक जागरूकता, नियमित तपासणी आणि एकीकृत केअर यासह थायरॉईडचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते.