Honey For Dark Circles: जागरण झालं, बरं वाटत नसेल किंवा काही इतर कारणांनी डोळ्यांखाली काळी वर्तुळं म्हणजेच, डार्क सर्कल्स (Dark Circles) येतात. डार्क सर्कल्समुळे तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. चेहरा निस्तेज, सुस्तावलेला दिसतो. अनियमित जीवनशैली, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, डिहायड्रेशन, निद्रानाश किंवा जास्त ताण यामुळे डार्क सर्कल्सची (Home Remedies For Dark Circles) समस्या निर्माण होते. 


डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवण्यासाठी मग सर्रास बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण त्यात केमिकल्स असतात, ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते. अशातच तुम्ही डार्क सर्कल दूर करण्यासाठी काही घरगुती पदार्थांचा वापर करू शकता. यामध्ये मधाचाही समावेश होतो. मध आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. तसेच, मध त्वचेचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतं. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होतात. शिवाय, त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते. 




डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यासाठी मधाचा वापर कसा कराल? 


मध आणि लिंबाचा रस (Honey And Lemon Juice)


डार्क सर्कल्सची समस्या दूर करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. मध आणि लिंबाचा रस एकत्र करुन लावल्यानं त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अॅसिड असतं, जे त्वचेवरील डाग आणि काळी वर्तुळं दूर करण्यास मदत करतं. एका भांड्यात एक चमचा मध घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालून चांगलं मिसळा. आता ही पेस्ट डोळ्याभोवती लावा आणि 2 ते 3 मिनिटं मसाज करा. साधारण 10 मिनिटांनी चेहरा पाण्यानं धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही प्रक्रिया पुन्हा करा.




मध आणि कोरफडीचा गर (Honey And Aloe Vera)


डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यासाठी मध आणि कोरफडीचा गर वापरा. त्यासाठी एका वाटीत एक लहान चमचा मध घ्या. त्यामध्ये एक चमचा कोरफडीचा गर घ्या. आता हे मिश्रण डोळ्यांखाली लावा आणि 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्यानं धुवून टाका. उत्तम रिझल्टसाठी आटवड्यातून 2 ते 4 वेळा याचा वापर करा. 




मध आणि टोमॅटोचा रस (Honey And Tomato Juice)


डोळ्यांखीलल डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी तुम्ही मध आणि टोमॅटोचा रस वापरू शकता. टोमॅटोच्या रसात व्हिटॅमिन सी असतं. यामुळे चेहऱ्यावरील डागांसोबतच डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यास मदत होते. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. त्यासाठी तुम्ही एका वाटीत एक चमचा मध घ्या. यामध्ये एक चमचा टोमॅटोचा रस घेऊन व्यवस्थित मिक्स करा. आता ही पेस्ट डोळ्यांच्या खाली लावा आणि 1 ते 2 मिनिटांपर्यंत हलक्या हातानं मसाज करा. 15 मिनिटांनी चेहरा पाण्यानं धुवून घ्या. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Coffee For Hair Growth: केस खूप गळतायत? चमकही नाहीशी झालीय? मग तुमच्या समस्येवरचा एकच उपाय, कॉफी; 'या' 3 पद्धतींनी करा वापर