Ashadhi Wari 2023: श्री क्षेत्र शेगावहून आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी (Gajanan Maharaj Palkhi) सध्या धाराशिव जिल्ह्यात (Dharashiv District) आहे. दरम्यान धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विदर्भ पंढरी शेगाव येथुन हरिनामाचा गजर करत दाखल झालेल्या श्री संत गजानन महाराज पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. उद्योगपती सुभाष देशमुख, उपसरपंच अमोल समुद्रे यांच्यासह भाविकांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी गण गण गणात बोते, ज्ञानोबा तुकारामच्या गजराने ढोकी नगरी दुमदुमून गेली होती.


शेगाव येथून आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखीचे शनिवारी ढोकीत आगमण झाले. यावेळी पालखीतील वारकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे ढोकीतील फ्रेन्ड्स ग्रुप व गणेश मंडळाच्या वतीने मसाला दूध वाटप व ठिकठिकाणी केळी, बिस्किट, नाष्टा देण्यात आला. गेल्या 54 वर्षांपासून तेरणा कारखाना येथे पालखीचा मुक्काम असतो. यंदा तेरणा साखर कारखाना सुरु होणार असल्यामुळे मोठ्या भक्तीमय वातावरणात श्रींच्या पालखीच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुस भगव्या पताका, स्वागत कमानी, डिजिटल कटाऊट व सुंदर रांगोळी काढुन दिंडीचे स्वागत करण्यात आले.


दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी 


तर पालखी कारखानास्थळी येताच तेरणा साखर कारखाना संचलीत भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत यांनी पालखीचे स्वागत केले व सुभाष देशमुख परिवाराच्या हस्ते श्रींच्या पालखीची आरती करण्यात आली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री हभप शिवाजी घाडगे महाराज यांची किर्तनसेवा झाली. यावेळी दर्शनासाठी ढोकी, कावळेवाडी, रुई, तुगांव, कौडगाव, गोरेवाडी, ढोराळा, बुकनवाडी, गोवर्धनवाडी, वाखरवाडी, कोंबडवाडी, तडवळा येथुन भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.


पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ!


ढोकी येथे शनिवारी सायंकाळी संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलीत भैरवनाथ शुगर येथे पाखलीचे आगमन होताच भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान. गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी सचिन साखरे (रा. मुरूड) यांच्या खिशातील एक मोबाईल व रोख 400 रुपये लंपास केले. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आलेल्या अन्य काही भाविकांचे मोबाईल व रोकडही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेवून चोरून नेली. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चोरीच्या वाढत्या घटनेमुळे भाविकातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून पोलिसांनी चोरट्यांना बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ashadhi Wari 2023: गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल; कळंबमध्ये हजारो भक्तांनी घेतले दर्शन