मेरी लोपेज यांना स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान झाल्यावर त्यांनी कर्करोगावरील नियमित उपचार घेण्यास नकार दिला होता. शाकाहार आणि अध्यात्मिक साधनेच्या सहाय्यानेच त्यांचा कर्करोग पूर्णपणे नाहीसा होईल, असा त्यांना विश्वास होता. मात्र अखेर कर्करोगानेच त्यांचा बळी घेतला.
लीज अँड मेरी यामधील लीज जॉन्सनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट करून तिची मामी मेरी लोपेजचं कर्करोगानेच निधन झाल्याचं जाहीर केलं. एवढंच नाही तर कर्करोगावर अतिशय महत्वाचे समजले जाणारे केमोथेरपी रेडिएशन सारखे उपचार सुरू असताना पुन्हा मांसाहार सुरू केल्याचाही दावा या नव्या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
शाकाहाराची कर्मठ पुरस्कर्ती अशी ख्याती मिळवलेल्या मेरी लोपेज यांचं निधन डिसेंबरमध्ये झालं असलं तरी त्यामागील कारणांचा आणि कॅन्सर बरा करण्यासाठी तिने केमोसारखे घेतलेले उपचार याविषयी रविवारी लिज अँड मेरी या यूट्यूब चॅनेलवर अपलोड झालेल्या नव्या व्हिडिओनंतर उलगडा झाला.
लीज अँड मेरी या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओने शाकाहार आणि मांसाहार यांच्यातील वादाला नव्याने तोंड फोडलंय. शाकाहाराचा कर्मठपणे अवलंब केल्यानंतरही कर्करोगाने पुन्हा पछाडलं, शेवटी केमोसारखे उपचार घेऊ मांसाहारही सुरू करावा लागला, तरीही आपल्या चॅनेलवरून शाकाहाराचं महत्व पटवून देणारे व्हिडिओ हटवले जाऊ नयेत असं मेरीने मरण्यापूर्वी सांगितल्याचा दावाही या नव्या व्हिडिओत करण्यात आला आहे.
2016 मध्ये मेरीने पोस्ट केलेल्या व्हिडिओत चौथ्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोगही फक्त शाकाहार आणि अध्यात्मिक साधना यामुळे बरा झाल्याचा दावा करण्यात आला होता. तो व्हिडिओ तेव्हा जगभरात पावणेचार लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला होता. कर्करोगावर मात करण्याचे निसर्गोपचार यावरही या दोघींनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता.
आता नव्याने अपलोड झालेल्या व्हिडिओची लिंक 2016 मध्ये अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलीय. तसंच या नव्या व्हिडिओमध्ये मेरीने शाकाहार आणि अध्यात्मिक साधनेचा कर्मठ पुरस्कार केला असला तरी कधीही प्रगत वैद्यकीय उपचार आणि कर्करोगासाठी असलेले केमोसारखे उपचार यांचा विरोध केला नाही असा दावाही करण्यात आला आहे.
मेरी लोपेज यांनी 2015 मध्ये कर्करोग असल्याचं निदान झालं होतं.