Mumbai: ओव्हेरियन(अंडाशय) कॅन्सर महिलांच्या अंडाशयात होतो. अंडाशय हे  स्त्रीयांच्या प्रजनन अवयवांपैकी एक महत्त्वाचा अवयव आहे जिथे अंडी (स्त्रीबीज) तयार होतात. बऱ्याचदा सुरुवातीच्या टप्प्यात या अंडीशयाच्या कर्करोगाचे निदान होत नाही. वांरवार पोट फुगणे, ओटीपोटात वेदना, वारंवार लघवी होणे आणि आतड्यांच्या हालचालींमध्ये बदल ही होणं ही या कॅन्सरची लक्षणं आहेत. जोखीम घटकांमध्ये वय, कौटुंबिक इतिहास आणि बीआरसीए१ आणि बीआरसीए२ सारखे अनुवांशिक घटकांचा समावेश आहे. याबाबत जागरूकता आणि वेळीच तपासणी हे परिणाम सुधारण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी गरजेचे आहे. (Women Health) 8 मे रोजी जगभरात अंडाशयाच्या कर्करोगाविषयी सजगता वाढावी यासाठी जागतिक अंडाशय कर्करोग दिवस साजरा केला जातो. (World Ovarian Cancer Day) 

अनुवंशिकता असल्यास जोखीम अधिक

ओव्हरियन (अंडाशय) कॅन्सरसाठी सर्वात महत्त्वाच्या जोखीम घटकांपैकी एक म्हणजे अनुवंशिकता. ज्या महिलांमध्ये अनुवंशिकरित्या बीआरसीए१ आणि बीआरसीए२ असे घटक आढळतात त्यांना ओव्हरियन कॅन्सरचा धोका अधिक असतो. हे अनुवांशिक घटक पालकांपैकी एकाकडूनही संक्रमित होऊ शकतात. स्तन किंवा अंडाशयाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनी अनुवांशिक समुपदेशन(जेनेटीक काऊन्सलिंग) सारख्या पर्यायाचा विचार करावा. बीआरसीए सारख्या अनुवंशिक घटकांबरोबरच लिंच सिंड्रोम, कोलन आणि एंडोमेट्रियल कर्करोगाशी संबंधित स्थिती देखील अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढवते. याठिकाणी वय हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. बहुतेक अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान हे 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये होते. वाढत्या वयाबरोबरच या कर्करोगाचा धोका वाढत जातो. 

वेळीच उपचार घेणं गरजेचं

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्यी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. केकिन गाला म्हणाल्या की, ओव्हरियन, स्तन किंवा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास लवकर निदानाने लक्षणीयरीत्या सुधारतो. जर सुरुवातीच्या टप्प्यात याचे निदान झाले तर, त्यावर मात करणे शक्य आहे. दुर्दैवाने पोट फुगणे, ओटीपोटात वेदना किंवा आतड्यांच्या हलचालींमध्ये बदल यासारख्या लक्षणांमुळे अनेक प्रकरणांमध्ये निदानास विलंब होतो व शेवटच्या टप्प्यात निदान होते. या कर्करोगाचा शोध घेण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच निदान व उपचार करणे गरजेचे आहे.

कोणत्या चाचण्या कराव्यात?

या कर्करोगाच्या तपासणी विषयी बोलताना मुंबईच्या झायनोवा शाल्बी हॉस्पिटल येथील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दीप वोरा म्हणाले की, अंडाशयाच्या कर्करोगासाठी सध्या कोणतीही प्रभावी चाचणी नाही. त्यामुळे त्याविषयी जागरूकता अधिक गरजेची आहे. नियमित पेल्विक तपासणी, उच्च-जोखीम प्रकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड इमेजिंग आणि लक्षणांबाबत जागरूक राहणे हे वेळीच निदानास मदत करू शकते. कौटुंबिक इतिहास किंवा अनुवांशिक धोका असलेल्या महिलांनी नियमित तपासणी करावी आणि आपल्या डॉक्टरांशी याविषयी वेळोवेळी चर्चा करणे गरजेचे आहे. उच्च धोका असलेल्यांसाठी, ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड आणि सीए-१२५ रक्त चाचण्यांचा सल्ला दिला जातो.

अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी...

जीवनशैलीत अचूक बदल करणे देखील या कर्करोगास प्रतिबंध करण्यास फायदेशीर ठरु शकते. वजन नियंत्रित राखणे, धूम्रपान टाळणे आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे यामुळे या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. कौटुंबिक इतिहासाबद्दल माहिती असणे आणि लक्षणे समजून घेणे हे त्या महिलांना वेळीच उपचार घेण्यास मदत करतील. म्हणूनच समाजात या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करत अनुवांशिक तपासणी आणि जीवनशैलीत योग्य बदल केल्यास महिलांना कर्करोगाचा धोका कमी करता येतो.

हेही वाचा:

आयुर्वेदिक कंपन्यांच्या संशोधन अन् नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे देशात होतोय कायापालट; आरोग्य क्षत्रात नवी नांदी!