Men Health: पुरुषांनो सावधान! निरोगी असूनही प्रजनन क्षमता घटतेय? कोणत्या चुका टाळल्या पाहिजे? तज्ज्ञ सांगतात...
Men Health: वाढत्या वयात पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यात अनेक पुरूषांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तज्ज्ञांची या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

Men Health: अनेक पुरुष स्वतःला पूर्णपणे निरोगी समजतात. नियमित व्यायाम, कोणताही मोठा आजार नाही, रक्ततपासण्याही सामान्य असल्या तरीही वाढत्या वयात पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करतात अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हे केवळ आजारांमुळे नव्हे तर वयासोबत होणाऱ्या जीवनशैलीतील बदलांमुळे घडते. निरोगी असल्यावर प्रजनन क्षमतेवर परिणाम होतच नाही असे नाही. कारण तुम्हाला माहिती आहे का? वय हे पुरुषांच्या प्रजनन प्रणालीवर परिणाम करतात. निरोगी असूनही पुरुषांना गर्भधारणेस संघर्ष करावा लागतो. याठिकाणी तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या टिप्स देखील दिल्या आहे ज्या पुरुषांनी न चुकता पाळल्या पाहिजेत. पुण्याचे नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी येथील डॉ. मधुकर ज. शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.
निरोगी असूनही वाढत्या वयात का घटते पुरुषांची प्रजननक्षमता ?
बऱ्याच पुरुषांचा असा विश्वास आहे की, जोपर्यंत ते निरोगी, सक्रिय आहेत तसेच त्यांना कोणताही मोठा आजार नाही तोपर्यंत त्यांची प्रजनन क्षमता अबाधित राहते. महिलांप्रमाणे पुरुषांमध्ये अचानक प्रजनन क्षमता कमी होत नसली तरी, पुरुषांच्या प्रजनन क्षमतेच्या बाबतीत वय महत्त्वाची भूमिका बजावते. हल्ली करिअरमुळे लग्नास विलंब होतो आणि त्यामुळे उशीराने कुटुंब सुरू करतात, त्यांना असे वाटते की त्यांचे आरोग्य चांगले आहे म्हणजे गर्भधारणा सहजच शक्य आहे. ते आपल्या वाढत्या वयाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करतात जे हार्मोनल असंतुलन, ताणतणाव आणि अनुवांशिक समस्यांशी जोडले जातात. मोठ्या संख्येने पुरुषांना त्यांच्या प्रजनन क्षमतेबद्दल माहितीच नसते. त्यामुळे आरोग्य समस्या नसतानाही केवळ वाढत्या वयामुळे पुरुषांना अनपेक्षित प्रजनन समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
वाढत्या वयात पुरुषांना गर्भधारणेसाठी संघर्ष का करावा लागतो?
शुक्राणूंची गुणवत्ता कमी होणे: विविध अभ्यासानुसार वाढत्या वयामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या, हालचाल आणि आकार हळूहळू कमी होऊ शकतो. जरी संख्या सामान्य दिसत असली तरी, शुक्राणूंमध्ये गुणसुत्रासंबंधी समस्या ही वयानुसार वाढते, ज्यामुळे यशस्वी गर्भाधान होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
हार्मोनल असंतुलन: टेस्टोस्टेरॉनची पातळी ही कालांतराने नैसर्गिकरित्या कमी होते. कमी टेस्टोस्टेरॉन शुक्राणूंचे उत्पादन, लैंगिक कार्य आणि एकूण प्रजनन कार्यक्षमतेवर परिणाम करु, जरी पुरुष शारीरिकदृष्ट्या निरोगी वाटत असले तरीदेखील या समस्या आढळून येतात.
काही वैद्यकीय परिस्थिती प्रजननक्षमतेवर परिणाम करतात: मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉईड विकार अशा समस्या वयानुसार अधिक सामान्य होतात. याचे अचूक व्यवस्थापन न केल्यास त्याचे शुक्राणूंच्या आरोग्यावर आणि प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतात.
तणाव आणि इतर जीवनशैलीच् घटक प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतात: दीर्घकालीन ताण, झोपेचा अभाव, धूम्रपान, मद्यपान किंवा प्रदूषण यासारखे घटक शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करतात आणि त्यामुळे. प्रजननक्षमतेच्या समस्या उद्भवू शकतात ज्या पुरुषांसाठी चिंताजनक असू शकतात. फ्रोजन फुड आणि जंक फूड यामधील काही घटक केवळ प्रजनन आरोग्यावर परिणाम करत नाहीत, तर ते गुणसुत्राच्या कार्यावर देखील परिणाम करतात.
अनुवांशिक समस्या: वडिलांचे वय वाढल्याने शुक्राणूंमध्ये अनुवांशिक उत्परिवर्तन होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे गर्भाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो आणि गर्भपात किंवा काही विकासात्मक परिस्थितींचा धोका वाढू शकतो.
वाढत्या वयात पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करु इच्छिणाऱ्या पुरुषांनी वंधत्व निवारण तज्ज्ञांचा सल्ला घ्या जे तुमच्यासाठी योग्य उपचार योजना आखतील. तज्ञ तुमचे संपूर्ण मूल्यांकन करतील आणि संतुलित आहार, व्यायाम, मेडिटेशन करुन तणावाची पातळी कमी करतील आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॅाल सारख्या परिस्थितींसाठी औषधांचे सेवन तसेच जीवनशैलीतील बदल सुचवतील. वंधत्व निवारण तज्ज्ञांनी दिलेल्या अँटीऑक्सिडंट्ससह काही औषधं ही डीएनए फ्रॅगमेंटेशन दुरुस्त करण्यात लक्षणीयरीत्या मदत करतील. वाढत्या वयात पुरुषांनी प्रजनन आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
हेही वाचा
Health : सर्दी-खोकला झाल्यावर ब्रँडी किंवा रम पिणे खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























