Health Tips : आपल्या देशात प्रत्येक प्रदेशात वेगवेगळी खाद्यसंस्कृती दिसून येते. मात्र भारतीयांच्या दैनंदिन आहाराकडे बारकाईने पाहिले तर बहुतेक लोकं जेवणात भात, पोळी, बटाटा किंवा गोड पदार्थ यांसारख्या कार्बोहायड्रेट्सचा समावेश असलेल्या पदार्थांचे प्रमाण अधिक असते, तर प्रोटीनचे प्रमाण तुलनेने कमी असते. परिणामी अनेकांच्या आहारात प्रोटीनकडे दुर्लक्ष होते आणि आहाराचा समतोल बिघडतो. याचा परिणाम स्नायूंचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे भारतीयांनी आपल्या दैनंदिन आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा समावेश करणे गरजेचे आहे.
भारतीय आहारात प्रोटीनचे प्रमाण कमी का असते?
भारतातील अनेक सांस्कृतिक, आहारविषयक आणि जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळे प्रोटीनचे प्रमाण कमी असते
1. कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असलेला पारंपरिक आहार
भारतीय आहारात भात, गहू, पोळी, पराठे किंवा इतर यांचा आहारात समावेश केला जातो. प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की डाळ, कडधान्य किंवा दुग्धजन्य पदार्थ हे अनेकदा जेवणात कमी प्रमाणात असतात.
2. शाकाहाराचे प्रमाण जास्त
भारतात मोठ्या प्रमाणावर लोक शाकाहारी आहेत. शाकाहारी आहारातूनही पुरेसे प्रोटीन मिळू शकते, पण त्यासाठी डाळी, कडधान्ये, सोयाबीन, दुग्धजन्य पदार्थ, सुका मेवा आणि मिलेट्स यांचे योग्य प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. मात्र अनेक वेळा असे केले जात नाही आणि त्यामुळे आहारातूम पुरेसे प्रथिनं मिळत नाहीत.
3. आहाराच्या खाण्याच्या सवयी
डाळ, पनीर, अंडी किंवा मांसाहार यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ मुख्य पदार्थ न मानता केवळ तोंडी लावण्याचे पदार्थ म्हणून याकडे पाहिले जाते.
4. प्रोटीनविषयी जागरूकतेचा अभाव
अनेकांना रोज किती प्रोटीन आवश्यक असते याची माहिती नसते. भात किंवा पोळी खाल्ल्यावर पोट भरल्याने आहार संतुलित आहे असे अनेकांना वाटते.
5. आर्थिक कारणे
डाळी, दुग्धजन्य पदार्थ, सुका मेवा, अंडी किंवा मांस यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ काही वेळा धान्यांच्या तुलनेत महाग वाटतात, त्यामुळे त्यांचे प्रमाण कमी ठेवले जाते.
6. धावपळीची जीवनशैली
व्यस्त दिनचर्येमुळे अनेक लोक ब्रेड, स्नॅक्स किंवा पॅकेज्ड फूडवर अवलंबून राहतात. या पदार्थात बहुतेकदा कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक तर प्रोटीनचे प्रमाण कमी असते.
7. गैरसमजूती
प्रोटीन फक्त खेळाडू किंवा बॉडीबिल्डर्सना आवश्यक असते किंवा जास्त प्रोटीन घेतल्यास किडनीला त्रास होतो, असा गैरसमज लोकांमध्ये आढळतो.
जास्त कार्बोहायड्रेट आणि कमी प्रोटीन का धोकादायक?
आहारात कार्बोहायड्रेट प्रमाण अधिक असणे आणि प्रोटीनची मात्रा कमी असणे हे शरीरावर नकारात्मक परिणाम करु शकतात.
1. वजन वाढणे आणि पोटाभोवती चरबी साठणे
जास्त प्रमाणातील कार्बोहायड्रेट शरीरात ऊर्जा म्हणून वापरले गेले नाही तर ते चरबीच्या स्वरूपात साठते, विशेषतः पोटाभोवती. त्यामुळे व्हिसरल ओबेसिटी वाढते. यामुळे इन्सुलिन रेसिस्टन्स, मेटाबॉलिक समस्या आणि सूज वाढण्याचा धोका असतो. लठ्ठपणा हा हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, फॅटी लिव्हर, स्लीप अॅपनिया, गाऊट, पित्ताशयातील खडे आणि पीसीओडी यांसारख्या अनेक आजारांचे मूळ कारण ठरू शकतो.
2. स्नायूंची झीज
स्नायूंचे आरोग्य टिकवण्यासाठी प्रोटीन अत्यावश्यक असते. पुरेसे प्रोटीन न मिळाल्यास शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायूंचे विघटन करू शकते, ज्यामुळे स्नायु कमकुवत होऊन शारीरीक उर्जा कमी होते.
3. मधुमेहाचा धोका
जास्त कार्बोहायड्रेट असलेला आहार जेवण वारंवार घेतल्यास इन्सुलिन रेसिस्टन्स वाढून टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
4. रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
प्रोटीन शरीरात अँटीबॉडीज तयार करण्यास मदत करते. त्यामुळे प्रोटीनची कमतरता असल्यास इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते.
5. भूक आणि क्रेव्हिंग वाढणे
प्रोटीनयुक्त पदार्थामुळे पोट जास्त वेळ भरलेले वाटते. कार्बोहायड्रेटयुक्त जेवण पटकन पचते, त्यामुळे पुन्हा भूक लागते आणि पुन्हा खाण्याची तीव्र इच्छा होते.
आहारात प्रोटीनचे प्रमाण कसे वाढवावे?
दररोजच्या आहारात खालील पदार्थांचा समावेश करून प्रोटीनचे प्रमाण वाढवता येते:
- पनीर, टोफू
- डाळी आणि कडधान्ये
- हरभरे, राजमा, सोयाबीन
- सुका मेवा आणि बिया
- अंडी
- मासे आणि चिकन
- क्विनोआ, ओट्स, बकव्हीट
- पालक, ब्रोकोलीसारख्या भाज्या
भारतीयांनी आपल्या दैनंदिन आहारात प्रोटीनला प्राधान्य देणे गरजेचे आहे. प्रत्येक जेवणात प्रोटीनचा समावेश करणे गरजेचे आहे. प्रोटीनयुक्त आणि संतुलित आहारामुळे स्नायू मजबूत राहतात, रक्तातील साखर स्थिर राहते, वजन नियंत्रणात राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे आरोग्यदायी जीवनासाठी समतोल आहार आणि पुरेसे प्रोटीन अत्यंत गरजेचे आहे.
- डॉ. अपर्णा गोविल भास्कर
बॅरिएट्रिक, हर्निया आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन
मेटाहील क्लिनिक; सैफी, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्स, मुंबई
हे ही वाचा :
