Health: मधुमेहाला (Diabetes) बऱ्याचदा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते, याचा हळूहळू शरीरातील विविध अवयव जसे की, डोळे, किडनी, हृदय, मेंदू आणि पेरिफेरल नर्व्ह्जवर अशा शरीरातील विविध अवयवांवर लक्षणीय नुकसान होते, जे कळून येत नाहीत, आणि तोपर्यंत याचे निदानही होत नाही. ‘मधुमेह’ हे भारतातील सर्वात मोठं आजारपणं आणि त्याचा मृत्यूदर सर्वाधिक असून भारताला जागतिक पातळीवर मधुमेहाची राजधानी असे म्हटले जाते. या संदर्भात डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल, मुंबई येथील कन्सलटंट कॉर्निया, कॅटॅरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. मिनल कान्हेरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तज्ज्ञ आणखी काय म्हणतात.. जाणून घेऊया..

मधुमेहामुळे डोळ्यांवर सर्वात वाईट परिणाम...

तज्ज्ञ सांगतात, मधुमेहाचा डोळ्यांवर होणारा परिणाम मोठा आहे (डायबेटिक आय डिसीज). मधुमेहामुळे रेटिनावर सर्वात वाईट परिणाम होतो. त्यामुळे रेटिनल मायक्रोअँजीओपॅथी होते. पर्यायाने रेटिनामधील लहान रक्तवाहिन्या खराब होतात आणि त्यातूनच डायबेटिक रेटिनोपॅथी होते. प्राथमिक टप्प्यात डायबेटिक रेटिनोपॅथी नॉन-प्रोलाइफरेटिव्ह म्हणजेच वाढणारी नसल्यामुळे त्याची लक्षणे सहज कळून येत नाहीत. त्यामुळे ही रेटिनोपॅथी प्रोलाइफरेटिव्ह टप्प्यात येईपर्यंत कळून न येण्याची शक्यता असते, त्यामुळे खूप उशीर होण्याची किंवा डोळे कायमचे खराब होण्याची शक्यता असते. नंतरच्या टप्प्यात रुग्णांना दृष्टी धूसर होणे, दुहेरी दिसणं, फ्लोटर्स, ब्लाइंड स्पॉट्स, कॉन्ट्रास्ट/कलर व्हिजन जाणे अशी लक्षणे दिसू शकतात. पापण्या अचानक खाली येणे आणि तिरळेपणा अशी लक्षणेही मेंदूतील एक किंवा जास्त क्रेनियल नर्व्ह्ज खराब झाल्यामुळे दिसतात. उच्च रक्तशर्करा पातळीमुळे डोळ्यांच्या इतर समस्या उदा. कॅटरॅक्ट, ग्लुकोमा, मॅक्युलर एडिमा आणि मॅक्युलर डिजनरेशन उद्भवण्याची शक्यता असते. हायपरटेन्शन, स्थूलत्व, उच्च कोलेस्ट्रॉल, तणाव, हृदयविकार, धूम्रपान आणि दारूचे सेवन यांसोबत मधुमेह असल्यास डोळे खराब होण्याचा धोका आणखी वाढतो.

प्रतिबंध करणं नेहमीच चांगलं 

मधुमेहावरील उपचारांचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे उच्च रक्तशर्करा पातळी कमी करणे. रक्तशर्करेशी संबंधित औषधे, जीवनशैलीत बदल उदाहरणार्थ नियमित व्यायाम, वजनावर नियंत्रण, निरोगी आहार, धूम्रपान आणि दारूचे सेवन न करणे यांसह ते साध्य करता येऊ शकते. खूपदा रूग्णांना रक्तशर्करा पातळीमधे बदल झालेले कळून येत नाहीत. मधुमेहामुळे शरीरावर होणारा परिणाम कळून येत नाही आणि कालांतराने तो सुधारण्याच्या पलीकडे जातो. म्हणूनच दीर्घकालीन बिघाड होण्याआधी प्रतिबंध करणं नेहमीच चांगलं ठरतं. नियमित तपासणी आणि योग्य व वेळेवर उपचारांच्या मदतीने दृष्टी कायमची जाण्यापासून वाचवता येऊ शकते. म्हणूनच शिस्तबद्ध देखरेख आणि रक्तशर्करेवर नियंत्रण, ऑप्थॉमॉलॉजिस्टद्वारे नियमित नेत्रतपासणी अनिवार्य आहे.

एक गंभीर आजार...

तज्ज्ञ सांगतात, मधुमेहामुळे, डायबिटिस मेलिटस हा सदोष ग्लुकोज मेटाबॉलिझममुळे होणारा गंभीर आजार असून त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळे शरीरातील विविध अवयवांवर परिणाम होतो आणि ते खराब होण्याची शक्यता असते.

हेही वाचा

Weekly Horoscope: नोव्हेंबरचा तिसरा आठवडा भाग्याचा की टेन्शनचा? मार्गशीर्षची सुरूवात, पैसा, करिअर, प्रेम जीवन? कोण होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)