Child Health: 2 एप्रिल हा जागतिक स्वमग्नता दिन पाळला जातो. स्वमग्नता (ऑटिइम) हे बाळाच्या विकासाशी संबंधीत एक अपंगत्व आहे, जे बाळाच्या सामाजिक विकास, संवाद साधण्याची क्षमता आणि वर्तणुकीसंबंधीत क्षमतेवर परिणाम करते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जागतिक स्तरावर १६० बाळांपैकी एकाला ऑटिजम आजार होतो. ऑटिजमचे कोणतेही एक कारण नाही. असे म्हटले जाते की पर्यावरणीय आणि जेनेटिक कारणांच्या एकत्रित प्रभावामुळे हा आजार उद्भवतो.

ऑटिझमची लक्षणं ओळखण्यासाठी पालकांची सर्वांत मोठी भूमिका 

ऑटिझमची लक्षणं ओळखण्यासाठी सर्वांत जास्त महत्त्वाची भूमिका पालकांना बजावावी लागते. आपलं बाळ कशा हालचाली करत आहे, ते कशाप्रकारे वर्तन करत आहे यावर त्यांनी लक्ष ठेवून त्यातले बदल नोंदवले पाहिजे. मुल आपले नाव ऐकूनही प्रतिसाद देत नाही. नजरेला नजर देऊन संवाद साधत नाही. आपल्या गोष्टी इतरांशी शेअर करत नाही. एकटाच खेळतो, दुसऱ्यांशी बोलायला त्याला आवडत नाही. शारीरिक स्पर्शापासून दूर पाळतो. चेहऱ्यावर चित्र विचित्र हावभाव असतात आणि आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करू शकत नाही. मtल उशिरा बोलायला शिकणे, एखादा शब्द वारंवार उच्चारणे, प्रश्नांची चुकीची उत्तरे देणे, दुसऱ्यांनी बोललेले शब्द पुन्हा बोलणे, आवडत्या गोष्टींना प्रतिसाद न देणे, हातवारे न करता येणे, मस्करी न समजणे जर अशी लक्षणे दिसून येत असतील तर बाळ स्वमग्न म्हणजेच ऑटिझम असल्याचे निदान केले जाते.

ऑटिझमचे निदान कसे कराल?

ऑटिझमचे निदान करण्यासाठी कोणतीही इमेजिंग चाचणी किंवा लॅब टेस्ट केली जात नाही. तीन वर्षांच्या बाळांच्या बिहेवियर आणि डेव्हलपमेंट स्किल्‍स वरूनच ऑटिझमचे निदान करता येते. ऑटिझमची खात्री करण्यासाठी मुलांची ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता यांची वैद्यकिय तपासणी केली जाते.

डॉक्टर सांगतात...

डॉ. अश्विनी राठोड -वाघ  (प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चिल्ड्रन, पुणे) - गर्भ वाढत असताना आणि जन्मल्यावर चेतासंस्थेचा विकास (neurodevelopmental disorder) होताना काही अडथळे निर्माण झाले तर हा आजार होतो. आनुवांशिकता आणि वातावरणातील वेगवेगळे घटक उदा. काही विषारी रसायने, गर्भावर परिणाम करणारी रसायने, जन्मतः आलेले आजारपण या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून स्वमग्नता येऊ शकते. जनुकीय, अर्भकावस्थेतील गुंतागुंत, आईची जीवनशैली व तणावाचे प्रमाण हेही या विकारास कारणीभूत ठरू शकते. परंतु अजूनही या विकारामागचे कारण संपूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.

गतिमंद आणि ऑटिझम यात बराच फरक...

डॉ. शिजी चालीपट (न्युरोलॉजिस्ट, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चिल्ड्रन, पुणे) -  स्वमग्न मुलांना अनेकवेळा ‘गतिमंद’ समजले जाते, परंतु गतिमंद आणि ऑटिझम यात बराच फरक आहे. ऑटिस्टीक मुलांना नुसतेच शाळेत घालून उपयोग नसतो, प्रत्येक मुलाची क्षमता, कल लक्षात घेऊन त्याप्रमाणे शिक्षण देणे आवश्यक ठरते. स्पीच थेरपी, फिजिओ थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, म्युझिक थेरपी, डान्स ड्रामा थेरपीचा वापर करावा लागतो. शैक्षणिक विकास पद्धती, कल्पकतेचा वापर करून शिकवावे लागते. ज्याचा उपयोग मुलांना व्यावसायिकरित्या सक्षम करण्यासाठी होऊ शकतो.