Breast Cancer in Men: स्तन कर्करोग हा केवळ महिलांचा आजार? पुरुषांमध्येही जाणवतात ही जीवघेणी लक्षणे, चुकुनही दुर्लक्ष करू नका
पुरुषांच्या स्तनाच्या कर्करोगावर उपचार करताना सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याबाबतच्या गैरसमजूती. बरेच पुरुष हे त्यांना स्तनाचा कर्करोग आहे असे मान्य करत नाहीत कारण ते त्याला 'स्त्रियांचा आजार' मानतात

Breast Cancer in Men: महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची समस्या वाढतेय, असं आपण अनेकदा ऐकतो. पण आता या कर्करोगाचा धोका पुरुषांनामध्येही वाढत असून पुरुषांमधील स्तनाचा कर्करोग तितकाच आक्रमक आणि जीवघेणा ठरु शकतो, विशेषतः जेव्हा या कर्करोगाच्या निदानास विलंब होतो. जागतिक आरोग्य संघटनेने सादर केलेल्या अहवालानुसार सुमारे 0.5-1% पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग आढळून येतो. (Breast Cancer)
मद्यपान, व्यसनं, लठ्ठपणामुळे पेशींचे नुकसान
यामागील कारणं अनुवंशिकही असू शकतात, म्हणजेच BRCA1 आणि BRCA2 जनुकांमधील उत्परिवर्तनांमुळे याचा धोका वाढतो. कौटुंबिक इतिहास, हार्मोनल असंतुलन, वय, मद्यपानाचे व्यसन, धूम्रपान आणि लठ्ठपणा यामुळे पेशींचे नुकसान होते. छातीत वेदनारहित गाठ आढळणे, स्तनाग्र आतल्या बाजूस वळणे किंवा स्तनाग्रातून होणारा स्त्राव, त्वचेचा लालसरपणा, सूज येणे किंवा अस्वस्थता जाणवणे यासारख्या धोक्याच्या लक्षणांमध्ये दुर्लक्ष करु नका. बऱ्याचदा पुरुष मंडळी या लक्षणांकडे कानाडोळा करतात. मात्र असे न करता पुरुषांनी नियमितपणे स्वयं स्तन तपासणी करणे किंवा स्तनांमध्ये कोणतीही असामान्य लक्षणं आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्यावा. महिलांप्रमाणेच पुरुषांनी देखील त्यांच्या स्तनांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे,असे पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलच्या प्रसूती, स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. अश्विनी राठोड यांनी स्पष्ट केले.
'या' गैरसमजुती आधी दूर करा
डॉ. अश्विनी राठोड पुढे सांगतात की, पुरुषांच्या स्तनाच्या कर्करोगावर उपचार करताना सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याबाबत असलेल्या गैरसमजूती. बरेच पुरुष हे त्यांना स्तनाचा कर्करोग आहे असे मान्य करत नाहीत कारण ते त्याला 'स्त्रियांचा आजार' मानतात. बऱ्याचदा या समस्येबाबत वाटणाऱ्या चर्चा करण्यास लाज वाटते आणि त्यामुळे उपचारास विलंब होतो. पुरुषांना स्तनाच्या कर्करोगाबद्दल शिक्षित करणे आणि त्यांना स्वयं स्तन तपासणी करण्यास आणि सितनामध्ये कोणतेही असामान्य बदल आढळल्यास तक्रार करण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे जेणेकरून निदानात होणारा विलंब टाळता येईल. उपचारांमध्ये ट्यूमर च्या प्रकारानुसार शस्त्रक्रिया (मास्टेक्टॉमी किंवा लम्पेक्टॉमी), केमोथेरपी, रेडिएशन थेरपी किंवा हार्मोनल थेरपीचा समावेश आहे. स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या पुरुषांनी अनुवांशिक चाचणी आणि नियमित आरोग्य तपासणीचा पर्याय निवडला पाहिजे. लक्षात असू द्या, वेळीच उपचार करून स्तनाच्या कर्करोगाशी लढणे शक्य आहे.
पस्तीशीनंतर एकदा चाचणी कराच
पुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगाबद्दल फारसे बोलले जात नाही, परंतु आता त्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. अनुवांशिक उत्परिवर्तन (जसे की BRCA1 आणि BRCA2), हार्मोनल असंतुलन, कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान आणि वाढते वय ही स्तनाच्या कर्करोगाची कारणे आहेत. कोणत्याही प्रकारची गाठ, स्तनाग्रात होणारे बदल किंवा छातीभोवती त्वचेतील बदल यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. पुर्वी बहुतेक प्रकरणांचे ६०-७० वयोगटातील पुरुषांमध्ये निदान होत असत; आता मात्र ३५ ते ४५ वयोगटातील पुरुषांमध्ये देखील स्तनाच्या कर्करोगाचे निदान होते. स्तन तपासणी, स्तनांचा मॅमोग्राम किंवा एक्स-रे आणि स्तनाचा अल्ट्रासाऊंड स्कॅन, बायोप्सीद्वारे कर्करोगाचे निदान केले जाते अशी माहिती तळेगाव येथील टिजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विवेक बांडे यांनी स्पष्ट केले.
उपचार काय?
पुरुषांवरही उपचार महिलांप्रमाणेच उरचार केले जातात यात शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन किंवा हार्मोन थेरपी यांचा समावेश असून कर्करोगाच्या टप्प्यावर आणि प्रकारावर हे उपचार अवलंबून असतात. जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये याबाबत जागरूकता पसरवणे गरजेचे आहे. पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा सामना करताना वेळीच निदान आणि व्यवस्थापन गरजेचे आहे. स्तनाचे आरोग्यास प्राधान्य देत पुरुषांनीही सतर्क राहिले पाहिजे असेही डॉ. बांडे यांनी स्पष्ट केले.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )



















