मुंबई : पाणी हेच जीवन आहे, असं म्हटलं जातं. आहार आणि पाणी आरोग्यासाठी आवश्यक घटक आहे. खाण्यापिण्याची योग्य वेळ पाळली तर आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतात. दिवसभरात किती पाणी प्यावं आणि पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, हे तुम्हाला माहीत आहे का? काही लोक जेवणासोबत पाणी पितात तर काहीजण सकाळी उठल्यानंतर तीन-चार ग्लास पाणी पितात. पाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आणि किती पाणी प्यावं, हे सविस्तर वाचा.


व्यायाम करताना पाणी जरूर प्या


व्यायाम करताना पाणी प्यावे की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काहींच्या मते, जिममध्ये जाताना पाणी पिऊ नये. बरेच लोक त्याचे अनुसरण  करतात. दरम्यान, जिममध्ये व्यायाम करताना तुम्हाला घाम येतो आणि शरीराला पाण्याची गरज असते. अशा परिस्थितीत मधेमधे पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे हायड्रेशनही कायम राहील आणि तुमच्या हृदयाचे ठोकेही नियंत्रणात राहतील.


जेवण करण्यापूर्वी किती वेळ पाणी प्यावे?


जेवताना पाणी पिऊ नये असंही बहुतेक जण सांगतात. जेवणाच्या तीस मिनिटे आधी दोन ग्लास पाणी प्या, यामुळे तुमचे पोट भरेल आणि तुम्ही अति खाणं टाळालं. असे केल्याने जेवणादरम्यान पाणी पिण्याची गरज भासणार नाही. जेवल्यानंतर अर्ध्या तासानेच पाणी प्या. याशिवाय आंघोळीच्या काही वेळापूर्वी तुम्ही पाणी पिऊ शकता. कारण यामुळे रक्त पातळ होण्यास मदत होते.


झोपण्याआधी पाणी प्यावं 


झोपण्या आधी दोन ग्लास पाणी प्या. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही आणि शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही. रात्री पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते आणि रात्री उठून पाणी पिण्याची गरज भासणार नाही.