नवी दिल्ली : आधुनिक जीवनशैली, ऑफिसमधील कामाचा प्रचंड ताण, अनियमित आहार आणि अपुरी झोप यामुळे नोकरदार वर्गाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः तरुण आणि मध्यमवयीन कर्मचाऱ्यांमध्ये मधुमेह (Diabetes), हृदयविकार (Heart Attack) आणि मानसिक ताणतणावाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत भारतीय उद्योग महासंघ (CII) आणि 'मेडीबडी' (MediBuddy) या डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्मच्या एका नवीन अहवालात अत्यंत महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. वर्षातून किमान तीन वेळा नियमित हेल्थ चेकअप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात भरती होण्याचा (Hospitalization) धोका इतरांच्या तुलनेत खूपच कमी असतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार, अनेक कर्मचारी कंपनीच्या वेलनेस प्रोग्रामअंतर्गत आरोग्य तपासणी तर करून घेतात, परंतु रिपोर्ट हातात आल्यानंतर पुढील वैद्यकीय सल्ला किंवा उपचारांकडे दुर्लक्ष करतात. तपासणी केलेल्या अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांकडून कोणताही फॉलो-अप घेतला जात नाही. त्यामुळे आजाराचे वेळेत निदान होऊनही त्यावर योग्य उपचार होत नाहीत. केवळ चेकअप करणे पुरेसे नसून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैलीत बदल करणे आणि नियमित औषधोपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये तासन् तास बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, जंक फूड आणि तणावामुळे हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. अगदी 25 ते 35 वयोगटातील तरुणांमध्येही हार्ट अटॅक आणि टाईप-2 मधुमेहाची लक्षणे दिसून येत आहेत.
या रिपोर्टमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य समस्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे:
20-25 वयोगट (तरुण वर्ग) : करिअरची सुरुवात, अनिश्चितता आणि स्पर्धेमुळे चिंता (Anxiety) आणि मानसिक ताणाचा सामना करावा लागत आहे.
30 ते 40 वयोगट : कामाचा प्रचंड ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, थकवा आणि जीवनशैलीशी निगडित (Lifestyle Diseases) आजार वाढताना दिसत आहेत.
40 वर्षांवरील कर्मचारी : जुने आणि दीर्घकालीन आजार (Chronic Illness) उफाळून येण्याचा धोका अधिक असतो.
बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत केवळ वार्षिक तपासणी कॅम्प आयोजित करण्यापुरत्याच मर्यादित राहतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांनी केवळ हेल्थ चेकअपवर न थांबता कर्मचाऱ्यांना नियमित डॉक्टरांचे मार्गदर्शन, समुपदेशन आणि फॉलो-अपसाठी मदत पुरवणे आवश्यक आहे. वेळेत घेतलेली काळजी भविष्यातील मोठा वैद्यकीय खर्च आणि गंभीर आजार टाळू शकते.
ही बातमी वाचा:
