Health Tips : हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. थोडासा जरी निष्काळजीपणा केला तरी तो महागात पडू शकतो. कारण हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सर्वाधिक असतो. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो असंही तज्ज्ञांचं मत आहे. ज्यांची जीवनशैली आणि आहार योग्य नाही त्यांनी वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे नेमकी कोणती? आणि ते टाळण्याचे उपाय कोणते? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका का असतो?


हृदयरोग तज्ञांच्या मते, हिवाळ्यात सकाळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. खरंतर, हिवाळ्यात शरीरातील रक्तवाहिन्या आकसतात, त्यामुळे रक्त वाहण्याचा मार्ग खूपच कमी होतो. त्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यात अडचण येते. त्यामुळे रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढल्याने हृदयाच्या स्नायूंवर जास्त दबाव पडतो. त्यामुळे छातीत दुखणे वाढते. छातीतील या दुखण्याला 'एनजाइना' म्हणतात. यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात.


हृदयविकाराचा धोका कसा कमी करायचा?


सकाळी लवकर उठू नका


हिवाळ्यात सकाळी थंडी खूप वाढते आणि अंथरुणावर शरीर उबदार राहते. अशा स्थितीत जर तुम्ही ताबडतोब अंथरुणावरुन उठलात तर शरीरातील रक्तवाहिन्या झपाट्याने आकुंचित होऊ लागतात. ज्यांना आधीच हृदयाची काही समस्या आहे किंवा कुटुंबातील कोणाला ही समस्या असेल त्यांना याचा धोका जास्त असतो. त्यामुळे अशा लोकांनी सावध राहावे.


सकाळी उठल्यानंतर काही वेळ बसा


हिवाळ्यात, अंथरुणावरुन उठणे आणि ताबडतोब बाहेर जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर काही वेळ पलंगावर बसून राहावे. त्यानंतर थोडी हालचाल करा. या काळात शरीर वातावरणाशी जुळवून घेते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.


सकाळी फिरायला जाताना लक्ष द्या


सकाळी चालणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. पण, हिवाळ्यात सकाळी लवकर उठणे आणि फिरायला जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हिवाळ्यात हलक्या सूर्यप्रकाशानंतरच सकाळी फिरायला जावे. त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला चिंताग्रस्त, थकल्यासारखे वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका; हे एक गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं