Health : पावसाळा आला की त्याच्यासोबत आल्हाददायक वातावरणासोबत इतर आजारही घेऊन येतो. पावशाळ्यात विविध जीवाणूंच्या वाढीस पोषक वातावरण असल्यामुळे संसर्गही झपाट्याने वाढतो. पाहायला गेलं तर, पावसाळ्यात उन्हाळ्यापासून दिलासा मिळतो. बहुतेक लोक पावसाळ्याच्या दिवसांचा आनंद घेतात, परंतु काही लोकांसाठी हा ऋतू त्यांना दुःखी वाटू शकतो. पावसाळ्यात अधिक सुस्त आणि उदास वाटणाऱ्या लोकांपैकी तुम्ही देखील आहात का? ही स्थिती मान्सून ब्लूज म्हणून ओळखली जाते. हा मानसिक आरोग्याचा विकार आहे की आणखी काही? जाणून घ्या सविस्तर...
आजकाल बरेच लोक मान्सून ब्लूजला बळी पडतात
तुम्हाला माहित आहे का? पावसाळ्यात शारिरीक आजारांसोबत मानसिक आजाराचं प्रमाण वाढतं. पावसाळ्यात ज्याप्रमाणे हवामान बदलतं, त्याप्रमाणेच तुमचा मूडही बदलत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण आजकाल बरेच लोक मान्सून ब्लूजला बळी पडतात, परंतु ज्ञानाच्या अभावामुळे ते त्याकडे लक्ष देत नाहीत. मान्सून ब्लूज ही एक मानसिक स्थिती आहे, जी तुमच्या मनावर आणि वागणुकीवर परिणाम करू शकते. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, मानसिक आरोग्य तज्ज्ञ कमल किशोर वर्मा यांनी याबाबत माहिती दिलीय. जाणून घेऊया.
मान्सून ब्लूज म्हणजे काय?
मान्सून ब्लूजला क्लिनिकल डिसऑर्डर म्हणून ओळखले जात नाही, म्हणजेच तो प्रमाणित आजार नाही. परंतु याकडे हंगामी भावनिक विकाराची समस्या म्हणून पाहिले जाऊ शकते. वैद्यकीय अहवाल सूचित करतात की, मानसिक आरोग्याच्या समस्या जसे की नैराश्य किंवा तणावाने ग्रस्त लोकांमध्ये हा एक सामान्य प्रकार आहे, ज्यामुळे ऋतूंनुसार मूडमध्ये बदल होऊ शकतात. मॉन्सून ब्लूजमध्ये ऋतूंसोबत मूड बदलांचाही समावेश आहे.
मान्सून ब्लूजची लक्षणे
मान्सून ब्लूजच्या लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास, अधिक उदास वाटणे, थकवा येणे, आळस, चिडचिड, भूक न लागणे, कोणतेही काम करावेसे न वाटणे इत्यादी लक्षणे आहेत. ही समस्या तणाव, चिंता किंवा नैराश्याने ग्रस्त लोकांमध्ये दिसून येते.
पावसाळ्याच्या दिवसांत उदासपणा का जाणवतो?
मान्सून ब्लूज हा क्लिनिकल डिसऑर्डर नसल्यामुळे, या समस्येची कारणे स्पष्ट नाहीत. काही सिद्धांतांचा असा विश्वास आहे की, पावसाळ्यात अनेक दिवस सूर्यप्रकाश न दिल्यामुळे तुमची उदासीनताही वाढू शकते. मुळात जेव्हा आपले डोळे सूर्यप्रकाश पाहतात तेव्हा ते मेंदूला संदेश पाठवतात जे झोप, भूक, तापमान, मूड आणि इतर अॅक्टीव्हिटी नियंत्रित करतात. पावसाळ्यात ही प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे तुम्हाला अधिक उदासपणाचा अनुभव येऊ शकतो. तुमचे झोपेचे-जागे चक्र किंवा तुमच्या शरीराच्या अंतर्गत घड्याळाला सर्कॅडियन रिदम म्हणतात. हे आपली झोप, मूड आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करते. यातून निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे तुम्हाला कमीपणा जाणवू शकतो.
मान्सून ब्लूजपासून मुक्त कसे व्हावे?
शारीरिक हालचाली वाढवल्या पाहिजेत.
पौष्टिक अन्नाचे सेवन करावे.
जुन्या मित्रांना भेटावे.
कुटुंबासोबत वेळ घालवावा.
योगासने करावीत.
सूर्यप्रकाशात वेळ घालवा.
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला अजूनही या समस्येपासून आराम मिळत नसेल तर तुम्ही ताबडतोब मानसिक आरोग्य तज्ञाची मदत घ्यावी. या काळात एकटे राहणे टाळावे.
हेही वाचा>>>
Women Health : शरीरात अत्यंत शांतपणे पसरतो 'हा' कर्करोग! महिलांनो.. चुकूनही 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )