Health: रात्री उशिरा ऑफिसमधून घरी येऊन 9 वाजता जेवण घेणं, कामाच्या मध्ये पिझ्झा किंवा स्नॅक्सवर ताव मारणं ओळखीचं वाटतंय ना? पण आता संशोधन सांगतंय की या सवयी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, रात्री 7 ते 8 वाजण्याआधी जेवण घेणं हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका (Heart Stoke) लक्षणीयरीत्या कमी करतं ,विशेषतः महिलांमध्ये. 

Continues below advertisement

ज्या लोकांनी नियमितपणे रात्री 9 नंतर शेवटचं जेवण केलं, त्यांना स्ट्रोक आणि इतर हृदयविकारांचा 28टक्क्यांपर्यंत अधिक धोका असल्याचं निष्कर्षांमध्ये आढळलं आहे. म्हणजेच, फक्त जेवणाची वेळ थोडी आधी आणून तुम्ही तुमचं हृदय अधिक निरोगी करू शकता. या सवयीमुळे  तुमची झोप अधिक शांत आणि वजन राहण्यासही मदत मिळते. 

लवकर जेवण आणि हृदयाचं आरोग्य

आपलं शरीर ‘सर्केडियन रिदम’ नावाच्या नैसर्गिक जैविक घड्याळावर चालतं. हे पचन, मेटाबॉलिझम आणि हृदयाची कार्यप्रणाली नियंत्रित करतं. लवकर जेवण केल्याने अन्नपचन या रिदमनुसार होतं, त्यामुळे शरीराला पोषणघटक नीट शोषता येतात. रात्री ९ नंतर जेवण केल्यास ही लय बिघडते आणि महिलांमध्ये स्ट्रोकचा धोका वाढतो, असं या अभ्यासात नमूद केलं आहे.

Continues below advertisement

लवकर जेवणाने पचन सुधारतं, झोप अधिक गाढ लागते

लवकर जेवण घेतल्यास शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे ऍसिडिटी, गॅस, फुगलेपणा आणि पोटातील जडपणा कमी होतो. उशिरा जेवण केल्याने झोपेचा चक्रही बिघडतं आणि थकवा जाणवतो. रात्री ७ वाजेपर्यंत जेवण केल्यास शरीर पचन पूर्ण करून नैसर्गिकरित्या शांत झोपेत जातं.

वजन नियंत्रण आणि मेटाबॉलिझमसाठी फायदेशीर

‘टाइम-रिस्ट्रिक्टेड ईटिंग’ म्हणजेच ठराविक वेळेत खाणं, हे वजन नियंत्रणासाठी प्रभावी मानलं जातं. लवकर जेवण घेतल्याने इन्सुलिन संवेदनशीलता वाढते, साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि उशिरा खाणं किंवा स्नॅक्सवर ताव मारणं टाळलं जातं. हे सर्व घटक एकत्रितपणे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात. पण अनेकदा कामाच्या वेळा, वाढलेला screentime आणि आपल्या बिझी आयुष्यात 7 च्या आधी जेवण करणे थोडे कठीण वाटू शकते. ही सवय लावून घेन्यासाठी काय करायचं? पाहूया 

लवकर जेवणाची सवय लावण्यासाठी काही सोपे उपाय

-नियमित वेळ ठरवा: दररोज ठराविक वेळी, शक्यतो रात्री ७ वाजण्यापूर्वी जेवा.

-आधीच नियोजन करा: जेवणाची तयारी आधी करून ठेवल्यास उशिरा जेवणाची सवय कमी होते.

-हलके, पौष्टिक अन्न खा: भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि कमी तेलकट पदार्थांचा समावेश करा.

-थोडं चालणं फायदेशीर: जेवणानंतर हलकं चालणं पचन सुधारतं आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतं.

-लवकर जेवण ही केवळ सवय नाही, तर एक आरोग्यदायी गुंतवणूक आहे. संशोधन सांगतंय की ही छोटी बदल आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारू शकते, झोप सुधारते, वजन नियंत्रणात ठेवते आणि दीर्घायुष्य देऊ शकते.