मुंबई : अनेकदा प्लास्टिकच्या डब्यातील अन्न हानीकारक असल्याचा युक्तिवाद केला जातो. पण खरंच असे अन्न खाण्याने शरीराला हानी होते का? प्लास्टिक कपमधून चहा पिण्याने कर्करोग होऊ शकतो का? आदीची उत्तरे अद्याप अनुत्तरीत आहेत. सध्या याच संदर्भातील एक मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जेवणासाठी प्लास्टिक डब्याच्या वापराने कर्करोगासारखे भयंकर रोग होऊ शकतात, असा दावा करण्यात आला आहे.
मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये रस्त्यांवर चहा पिण्यासाठी प्लास्टिकच्या कपचा सर्रास वापर केला जातो. पण सोशल मीडियावरून व्हायरल होणाऱ्या मॅसेजमध्ये चहा पिण्यासाठी प्लास्टिकचा वापर शरीराला अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
या मॅसेजसाठी देशातील सर्वात मोठे रुग्णालय एम्सचा संदर्भ देऊन हा संदेश व्हायरल होत आहे, या मॅसेजमध्ये म्हटल्यानुसार, प्लास्टिक उष्ण पदार्थाच्या संपर्काच आल्याने अन्न पदार्थामध्ये घातक केमिकलची निर्मिती होते. ज्याने एकूण 32 प्रकारच्या कर्करोग होण्याचा धोका संभवतो.
या संदर्भा एबीपी माझानं तज्ञांशी संवाद साधला. आयुर्वेदाचार्य डॉ अमोल कांबळे यांनी म्हटलं की, वास्तविक, यासंदर्भात वैज्ञानिक संशोधन होण्याची गरज आहे. कारण, प्लास्टिकची उत्पादने निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण आधिक आहे. शिवाय प्लास्टिकमध्ये काही शरीराला घातक केमिकल निर्माण करणाऱ्या घटकांचा समावेश असतो. त्यामुळे संशोधनानंतरच प्लास्टिकच्या डब्यात अन्न ठेवणे कितपत घातक आहे, हे सिद्ध होईल.
डॉ अमोल कांबळे यांनी सांगितलं की, अभ्यासात असे आढळून आले आहे की प्लास्टिकमधील काही रसायने प्लॅस्टिकमधून बाहेर पडू शकतात आणि आपण खात असलेल्या अन्न आणि पेयांमध्ये प्रवेश करू शकतात. यापैकी काही रसायनांमुळं चयापचय विकार (लठ्ठपणासह) आणि कमी प्रजनन क्षमता यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
हलक्या प्रतीच्या प्लास्टिकच्या भांड्यामधून अन्न खाणं जास्त धोकादायक आहे. तसेच गरम खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या डब्यातून देणं देखील अपायकारक आहे. त्यामुळं अन्नपदार्थ थंड झाल्यानंतरच डब्यात भरावे, असं आवाहन देखील डॉ कांबळे यांनी केलं आहे.