Dussehra 2022 : सगळीकडे नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस देवींची पूजा केल्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा (Dussehra 2022) हा सण साजरा केला जातो. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दोन वर्ष कोरोना काळानंतर यावर्षी दसरा (Dussehra 2022) 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. विजयादशमी (Vijayadashami) म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. 


साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या दसऱ्याच्या दिवशी एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. या दिवशी काही लोक नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची, सोन्याची खरेदी करतात. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. महाराष्ट्रात घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच, घरोघरी सोनं म्हणून आपट्याची पानं देण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे भारतातील विविध प्रांतात दसरा कसा साजरा केला जातो हे जाणून घ्या. 


भारतातील विविध प्रांतांतील दसरा


महाराष्ट्र


महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात. तसेच, बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा आणि शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात. घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच 'सोनं' म्हणून आपट्याची पानं वाटण्याची परंपरा आहे. 


उत्तर भारत


उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालू असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात. कुलू शहरातला दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.


गुजरात


सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.


छत्तीसगड


छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्त्व दिले जाते.


पंजाब


पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करतात. या दिवशी लोक एकमेकांना मिठाई देऊन हा सण आनंदाने साजरा करतात.  


दक्षिण भारत


आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसांत दर तीन दिवशी देवीच्या एक-एक रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन दिवस सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. या दिवशी लोक एकमेकांना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.


आंध्रप्रदेश


आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्याच बरोबर दसऱ्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते याला 'थेपोत्सवम' असे म्हटले जाते. तसेच, मंदिरात आयुध पूजाही होते.


कोल्हापूर


महाराष्ट राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान हे अंबाबाई देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथील दसरा सोहळाही वैशिष्ट्यपूर्ण असतो. तेथील ऐतिहासिक दसरा चौकात हा सोहळा होतो. शाहू महाराजांचे वारस या कार्यक्रमात सहभागी होतात. संध्याकाळी भवानी मंडपातून मिरवणुकीला प्रारंभ होतो. विविध वाद्ये, तोफांचे आवाज, वाद्य पथके, सनई चौघडे, हत्ती घोडे यांची शोभायात्रा निघते. राज परिवार आणि सर्व नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेतात. शमीचे पूजन, मंत्रोच्चार करतात आणि शाहू महाराजांच्या पुतळ्याची पूजा करतात.


म्हैसूर 


चामुंदेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर ठेवून काढली जाणारी मिरवणूक हे म्हैसूरच्या संस्थानी दसऱ्याचे विशेष आकर्षण आहे. देश-विदेशातील पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी भारतात येतात. संगीत, नृत्य, वाद्यवादन, हत्ती, घोडे, उंट यांची मिरवणूक हे या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे. 


महत्वाच्या बातम्या :