नवी दिल्ली : अनेक महिलांकडून ब्यूटी स्लीप विषयी तुम्ही ऐकलं असेल. अनेकांना त्यात तथ्य नसून, ते एक मिथक वाटतं. पण ब्यूटी स्लीप मिथक नसून, सत्य आहे. एका नव्या संशोधनानुसार, वेळेवर झोपण्याने तुमच्या व्यक्तीमत्त्वात फरक पडतो, असा दावा करण्यात आला आहे.


रॉयल सोसायटी ओपन सायन्स जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चनुसार, जर एखाद्या व्यक्तीची दोन रात्र पूर्ण झोप झाली नसेल, तर त्याच्या व्यक्तीमत्त्वावर त्याचा परिणाम होतो. स्टॉकहोम विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबतचं संशोधन केलं आहे.

या संशोधनसाठी डॉक्टरांनी 25 जणांचं अध्ययन केलं. यातील एका समुहाला दोन रात्र मनसोक्त झोपण्यास सांगितलं होतं. तर दुसऱ्या समुहाला दोन रात्रींसाठी केवळ चार-चार तास झोप घेण्यास सांगितलं होतं.

या अध्ययनावेळी दोन्ही समुहातील व्यक्तींचे मेकअपशिवाय फोटो काढण्यात आले. त्यांचे हे फोटो 122 अज्ञात लोकांना दाखवून यामधील अॅक्टिव्ह, हेल्दी, उत्साही, आणि विश्वसनीय कोण वाटतो, असं विचारलं. यावेळी अनेकांनी वेगवेगळी उत्तरं दिली.

पण यातील बहुतांश जणांनी ज्या लोकांची चार-चार तासच झोप झाली होती, त्यांच्याविषयी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. तर ज्यांची झोप पूर्ण झाली होती, ते सर्वाधिक उत्साही आणि त्यांच्या चेहऱ्यावरही प्रसन्नता होती.

यावरुन ज्यांची झोप वेळेवर होते, त्यांचं आरोग्यही चांगलं असतं, तसेच ते सदैव उत्साही असतात, असा दावा संशोधकांनी केला आहे. तसेच यामुळे लोक तुमच्या व्यक्तीमत्त्वाप्रती सकारात्मक असतात असंही संशोधकांनी सांगितलं.

त्यामुळे तुमच्या व्यक्तीमत्त्वात सकारात्मक बदल घडवण्यासाठी रोज आठ तास झोप पूर्ण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

टीप : या संशोधनातील दाव्यांची एबीपी माझाने पडताळणी केली नाही. पण यासाठी तुम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकता.